या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुन्हा तिचं मन तिला म्हणायचं, ‘नाही प्रियू, तू वाईट विचार करते आहेस पण अंतिम हेतू चांगला आहे..!'
 सहज तिच्या वाचनात एकदा लेख आला होता. कॅलिफोर्नियात ‘मर्सी किलिंग'चा कायदा करण्यात आला होता. त्या संदर्भात! - जेव्हा जगणं हे मरणाहून दु:सह असतं, तेव्हा रोग्याच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन त्याला मृत्यू येईल असं इंजेक्शन दिलं जातं... व झोपेतच त्याचा मृत्यू होतो...!
 ती काहीही वाचत असली, विचार करत असली तरी त्याचा केंद्रबिंदू बंडू आणि फक्त बंडूचा असायचा!
 जेव्हा आपला शेवट जवळ आला असेल तेव्हा बंडूसाठी ‘मर्सी किलिंग' केलं तर?
 या विचारानं ती हादरून गेली. “मी असा वेडावाकडा विचार का करते आहे! मी बंडूची आई आहे का वैरीण - त्याच्या जिवावर उठलेली? इडा पिडा टळो, अमंगल न घडो-"
 इतरांसाठी ते एक चमकदार सुभाषित असेल, पण प्रियूच्या जीवनानं अशा कलाटण्या तिच्या चाळीस वर्षाच्या कालावधीत घेतल्या होत्या की, ती खरोखरीच क्षणाची पत्नी - पत्नी पण नाही... प्रेयसीच होती व त्या छोट्या कालखंडानंतर आतापर्यंत ती एक आईच होती. आणि कुठलीही आई, अंतिम हेतू केवढाही उदात्त असला तरी, आपल्या पुत्राच्या बाबत ‘मर्सी किलिंग'चा निर्णय घेऊ शकत नव्हती - नाही.
 आणि प्रियूला तर वाटायचं - आजचा हा बालबुद्धीचा बंडू आपल्या अविचाराचं व अपराधाचं फळ आहे. त्याला जपणं व जगाच्या आचेपासून दूर ठेवणं हे आपलं प्रायश्चित्तच आहे व ते वास्तविक कधीच पुरं होणार नाही, तरीही आपल्या अंतिम श्वासापर्यंत ते मला घ्यायलाच हवं....
 मनात कितीही असलं तरी आपल्या हातानं प्रियू करू शकत नसली तरी तो विधाता ‘मर्सी किलर'च होता... साध्या तापाच्या निमित्ताने त्याने बंडूच्या जीवनाचा शेवट केला.
 आता आपल्या माघारी त्याचं काय होईल ही तिची चिंता देवानं आपणहून सोडवली होती. आणि अधूनमधून सारखा तिच्या मनात ‘मर्सी किलिंग'चा विचार घोळायचाच, त्यामुळे तिच्या नकळत तिच्या मनानं बंडूच्या मृत्यूची व तो स्वीकारण्याची तयारी केली असावी.... त्यामुळे अनपेक्षिततेचा धक्का बसला नाही. तिला कदाचित याहीमुळे असेल की, मृत्यूहून भयंकर जीवन तिच्या वाट्याला आलं होतं आणि त्यामुळे मृत्यू तिच्या मनावरचा एक फार मोठा भार उतरवून गेला होता.

 ही सुरुवातीची - फर्स्ट रिअॅक्शन; नंतर मात्र विशुद्ध वेदनेचा पारा तिच्या

४८ ॥ लक्षदीप