या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रया गेली होती. आता तिची सारी हाडे उठून दिसत होती.... एकदम चिपाड झाली होती.
 जहरी विंचवानं नांगी मारताच वेदनेचा जाळ व्हावा, तशी गजरा मनोमन विव्हळून उठली. तिच्या मनात कसले कसले विचार येत होते, की त्यांच्या स्वैरपिसाट गतीचा आवेग तिला पेलवेना. एका तिरमिरीत ती पुढे झाली आणि खिडकी बंद केली. वळून भिंतीवरचा विरलेला छोटा आरसा हातात घेऊन आपलं शरीर वेगवेगळ्या कोनातून निरखू लागली.
 तिच्या कानात पुन्हा एकदा हणमंताचे रात्रीचे बोल घुमू लागले, “गजरे, काय अवस्था करून घेतलीस जरा पहा - हार्ड हाडं लागताहेत नुसते... मजा नाही येत पूर्वीसारखी... ती जर्सी गाय आणि तू, दोघीपण हाडकलात...." आणि त्यानं तिला दूर सारलं होतं!
 तिच्या हातून आरसा गळून पडला. फुटायचाच तो, पण खाली तिनं दूर केलेलं पांघरूण होतं, म्हणून बचावला एवढंच!
 तिची नजर हणमंताकडे गेली. संथ लयीत तो घोरत होता. अंगावर फक्त लेंगी होता. त्याची उघडी, भरदार केसाळ छाती श्वासाच्या लयीनं खालीवर होत होती. त्या छातीत स्वत:चं मस्तक घुसळीत तो पुरुषी दर्प श्वासात खोलवर ओढून घेणं ही तिच्या सुखाची परमावधी होती!
 पण आजचा दिवस वेगळेच रंग घेऊन आला होता. त्याचे कालचे काळजात घाव घालणारे बोल अजूनही तिच्या कानात घुमत होते. त्यामुळे त्याचं उघडं, पीळदार शरीर पाहून नेहमी रोमांचित होणारी गजरा आज कडवटली होती.
 त्याच्या लेखी तिचं वळसेदार शरीर एवढंच सत्य होतं. त्या सुडौल देहात स्त्रीत्वाची भावना असलेलं तिचं स्त्रीमन त्याला क:पदार्थ होतं!... लग्नानंतर आठ वर्षांनी गजराला हे प्रकर्षानं प्रथम जाणवत होतं. त्याच्या लेखी ती व जर्सी गाय दोन्ही होडकल्यामुळे निकामी ठरल्या होत्या, हेच सत्य त्यानं काल रात्री बोलताना ठसठशीतपणे अधोरेखित केलं होतं.
 तिच्या मनावर मणामणाचे ओझे दाटून आले होते. जिवाच्या कराराने पाझरण्याच्या सीमेपर्यंत पोचलेले डोळे ती कोरडे राखायचा प्रयत्न करीत होती.

 कारण जो दिवस कष्ट व श्रमाची एक प्रदीर्घ वाटचाल घेऊन आला होता, त्याची सुरुवात अशी पाझरलेली गजराला परवडणारी नव्हती. चव्हाणांच्या त्या गढीसमान वाड्याची झाडलोट, अंगणसडा, सर्वांचं चहापाणी, मग भाक-या थापणं... कितीतरी कामं तिला यंत्रवत गतीनं उरकायची होती. तीन वर्ष सतत दुष्काळाच्या तडाख्यानंतर वाड्यावरची गडी व बाईमाणूस तिनंच कमी केले होते. त्यामुळे वरकडीची

लक्षदीप । ५९