या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "नाय मुकादमदादा, म्या लई लांबून आलो हाय... आनी विसपुते सायेबांनी तुमास्नी त्यांचं नाव सांगाया सांगितलंय. तेंच्या पंचायतीमार्फत अर्ज दिलाय कामासाठी तवा-!"
 "अच्छा - अच्छा, तूही आता हक्कानं काम मागतो आहेस." मुकादम त्याच्याकडे आरपार संशयानं पाहात म्हणाला, “ठीक आहे, आजचं तर काम संपलं. उद्या सकाळपासून घेतो तुला कामावर."
 त्या रात्री तिथंच झाडाखाली ते कुटुंब झोपलं, सकाळ होताच तयार होऊन ते मुकादम येण्याची वाट पाहू लागलं.
 मुकादम व कृषी सहायक एकदमच आले, तोवर सारे मजूर कामासाठी जमा झाले होते. त्याच वेळी ज्या शेतात नाला बंडिंगचं व सपाटीकरणाचे काम चाललं होतं, त्याचा मालक आला आणि म्हणाला, “रामराम साहेब, आजपासून काम बंद करा. मला इथे उन्हाळी भुईमूग घ्यायचं आहे, त्यासाठी पंचायत समितीनं बियाणं व खताची पिशवी पण दिलीय. विहिरीत थोडे पाणी आहे, त्यावर घेण्यासाठी शासनानं सांगितलं बघा!"
 साच्या मजुरांचे चेहरे काळवंडले. राघूच्या पोटात तर धस्स झालं. जमीन सपाटीकरणासाठी शेतक-याची संमती आवश्यक असते, ती नसेल तर काम करता येत नाही. या शेताचा मालक महादेव चेडे पाटलाला उन्हाळी भुईमूग घ्यायचा होता, तेव्हा काम बंद करणे क्रमप्राप्त होतं.
 कृषी खात्याच्या नवीन धोरणाप्रमाणे एका काऊडेपमध्ये नालाबंडिंग, जमीन सपाटीकरण ही कामे घेता येत असत. यापैकी या गावच्या एकमेव काऊडेपमधलं नालाबंडिंगचं काम नुकतचं संपलं होतं व मंगळवारपासून चेडे पाटलांच्या जमिनीतलं सपाटीकरणाचे काम चाललं होतं व आता ते काम त्यांच्या संमतीअभावी बंद ठेवणं भाग होतं.
 रांजणीत दुसरा काऊडेप नसल्यामुळे त्या गावी आता रोजगार हमीचं काम संपुष्टात आलं होतं.
 राघू, मैना व ठकूबाई सारेच सुन्न झाले. काल दिवसभर वणवण करीत जवळपास सहा कि. मी. अंतर पायी मोठ्या जिकिरीनं तुडवलेलं. रात्री केवळ पाण्यावर पोटं मारून झोपली होती. आज मात्र काम नसल्यामुळे पुन्हा तेवढंच जीवघेणं अंतर परत तुडवीत गावी जाणं आलं.
 हातावर पोट असलेल्यांना फारसं बोलता येत नाही, की आपल्या भावनांच प्रदर्शनही करता येत नाही. परिस्थितीचं भान कधीही हरवत नाही. राघूनं परतायचं ठरवून त्याप्रमाणे परतीची वाट धरली.

 कालच्यापेक्षा आज ठकूबाईला जास्ती त्रास होत होता. अंग चांगलंच तापल

७८ । लक्षदीप