पान:लक्ष उर्मी (Laksh Urmi).pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आण्णा मुडलगीला व छोटी कंपनी व मामी तेरदाळला असे आमचे कुटुंब तीन ठिकाणी पांगले. सर्वात दुःख मला झाले. अर्थात मग आंबू व मामांची सवय होती. बेळगावला एकदोनदा राहिले होते. पण भावंडांना सोडून व आईवडिलांना सोडून जायचे खूप दुःख झाले. जुगळकर म्हणून एक मास्तर मला बेळगावला घेवून गेले. टिळकवाडीत एका घरात ते रहात होते. (त्यांच्या मामाकडे) संध्याकाळी दत्ता केशकामत मला आंबूकडे घेवून गेले. त्याच्या सायकलवरून आंबूचे घर यावेळी रेघे कंपाऊंडमध्ये गोंधळी गल्लीत होते. पहिल्यांदा मी गेले तेव्हा मांदुरगल्लीत रहात होते. महिना असेल एप्रिल मेचा. माझे नाव जूनमध्ये शाळा नं. ३ (मुलींची) समादेवी गल्ली येथे घातलं गेलं. नक्की कितवीत होते आठवत नाही ३ री किंवा ५ वीत होते एवढे खरं. शाळा तशी लांब नव्हती. पण चौथी पर्यंतच होती. बाजूला समदेवीचे देऊळ व मोठे अंगण होते. शाळा सुटली की दप्तर देवळाच्या पायरीवर ठेवून भरपूर खेळून मग मी घरी जात असे. कारण घरी खेळायला कुणी नसे. लंगडी, खो-खो, उभा खो-खो व एकट एकटं असले खेळ खप खेळायचो. दोरीच्या उड्या पण मारायची. दिवस बरा जायचा. पण घरात आलं की आण्णा, मामी व भावंडांची आठवण यायची. रडायला यायचे. मग मी बाथरुममध्ये अगर व्हरांड्यात रडून यायची. खाताना पण घशात अडकल्यासारखे व्हायचे. खायला प्यायला कमी नव्हते. तसे आंबू मामा प्रेमाने वागायचे. पण कळपातून कोकरू लांब राहिलं की कसं त्या कोकराला एकटं एकटं वाटतं तसचं माझं होत होतं. घरी लहान मुलं असल्याने व मला मुलांची आवड असल्याने मन रमायचं. थोडे दिवस तसे काम वगैरे नसायचं. पण हळूहळू कामं पण पडू लागली. तसं मामी कधी चली जवळच काम सांगत नसे . त्यामुळे मला मुलांना खेळवणं, पाटपाणी घेणं असलं जमायचं, पण मुलं आजारी असली की मला बरचं करायला लागायचं. मग अरुणाचा जन्म झाला. ती लहान असताना ( १ महिन्याची) आंबूला टायफाईड झाला त्यामुळे बाळाला दूध घालण्यापासून मलाच करावे लागले. अशी मध्ये मध्ये शाळा चुकायची. पण तरी मी लवकर उठून अभ्यास करायची. पण शाळेत गैरहजर रहावं लागे. आंबू आजारी असल्याने तिने मला पेज करायला सांगितली. पेज म्हणजे मला माहित नव्हतं. तिने थोडे तांदूळ व भरपूर पाणी घालून शिजवायला सांगितलं. त्याप्रमाणे मी पेज केली. झाली का । घरात एक बाबू नावाचा मुसलमान नोकर होता. तो प्रकाशला। सांभाळायला आला. म्हणजे माझ्यानंतरच तो प्रकाशला सांभाळायला, ४८ सालापासूनच आला. तो प्रकाशला भरवणं, झोपवणं सगळचं करायचा. घरातली पण झाडणं, बिछाने घालणे, बिछाने काढणे याही गोष्टी करायचा. एकूण काय वरची कामे करायचा. आंबूला स्वयंपाकाची तेवढी आवड नव्हती. करायची खूप छान. पण तिची तरी काय चूक. नेहमी गरोदर, बाळंतपण, लहान मुलं व आजारपण, त्यामुळे मामा नावाच्या माणसाला म्हणजे त्याला आम्ही सर्व मामा म्हणत होतो, गोव्याकडचा होता. त्याला स्वयंपाकाला ठेवले म्हणजे घरातच रहायचा. मला तो नर्सबाई म्हणायचा. कारण मी बांगड्या घालत नव्हते. प्रकृतीने छान गोल, गुबगुबीत हात व बांगड्या नाही. त्यामुळे मामा चिडवायचा. बांगड्या न घालण्याला कारण होते. एकदोनदा बांगड्या घेवून दिल्या. (काचेच्या) व त्या लगेच फुटल्या. मग आंबू रागवायची. त्यामुळे मी बांगड्या घालायचे सोडून दिले. या मामाचे जेवण अफाट होते. करायचे भरपूर खायचे भरपूर, मी, मामा व आंबू जेवढं खाऊ तेवढं त्याला एकट्याला लागायचे. वर्षाचा भाताचा तया ६ महिन्यात संपला, तेव्हा मात्र आंबूनी त्याला काढून टाकले. तो असेपर्यंत मजा होती. उठल्या उठल्या नाष्टा व चहा मिळे. त्याच्या हातालाही चव होती. माझी प्रकृती पुढच्या हालअपेष्टा सहन करण्यासाठी चांगली तयार झाली असे म्हणायला हरकत नाही. मामा गेल्यावर परत स्वयंपाकाला कुणालाही ठेवले नाही. मध्ये मध्ये एक दोन बायका भाकरी पोळी करायला होत्या पण पुढे नाही. मामा (आंबूचे मिस्टर) सकाळी ९ ला मुस्लिम को-बँकेत जायचे. तिथं ते मॅनेजर म्हणून काम करायचे. त्यांना नोकरी करणं आवडत नव्हतं. पण ते खूप हुषार होते. त्यामुळे त्या लोकांनी जुलमानीच ती नोकरी करायला भाग पाडलं होतं. ती बँक सकाळी ९.३० ला सुरु व्हायची. त्यामुळे आमचा नाष्टा नऊला व्हायचा. अर्थात ताजे काहीतरी - कायलोळी, तवसोळी, थालीपीठ, भाकरी, चपाती, उपमा, पोहे काही पण भरपूर खाऊन शाळेला जायचे व दीड-दोनला जेवण. त्यामुळे मी शाळेतून २ वाजता जेवायला येत असे. स्वयंपाकी मामा असेपर्यंत मजा होती. आरामात उठायचं, स्वतःचे आवरायचे, थोडं काही असेल ते काम करून नाष्टा करून अकरा वाजता शाळा व दुपारी येवून जेवण करायचं. मामा थांबलेलाच असायचा वाट पाहात. मग मी परत पळत २.३० ला शाळा गाठायची. पण मामा गेल्यावर मला पण काम करावे लागायचे. नाष्ट्याची तयारी करणे, कुकर लावणे, चहा करणे ही कामे मला हळूहळू पडली. म्हणजे काम करायला व चुकली की शिव्या खायला इथून सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही.