हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाळीत असे. अशा रीतीनं लेखक आपल्या परिचयाच्या वाचकांशी जितक्या अलिप्तपणे समरस होतो, तितक्या अलिप्तपणे मी सुमित्रा गोखलेशी समरस होत असे. अशा परिचयाच्या वाचकांशी जसं एक अलिप्तपणाचं, औपचारिकपणाचं नातं निर्माण होतं, तसं ते सुमित्रा गोखलेच्यात आणि माझ्यात निर्माण झालं होतं.
 परंतु एक दिवस या नात्याच्या मर्यादा झुगारून देण्याचा तिनं प्रयत्न केला. त्या दिवशी मी फोर्टमध्ये आपल्याच तंद्रीत रस्त्यानं चाललो होतो. इतक्यात ती समोरून आली. हसत हसत आडवा हात धरून तिनं मला अडवलं आणि विचारलं, "कुठं निघालात?"
 तिनं हात आडवा करून अडवावं, हे मला आवडलं नाही. तरीही हसून औपचारिकपणे मी म्हणालो, “सहज इकडेच." आणि बाजूच्या शोकेसेसमध्ये ठेवलेल्या रंगीबेरंगी कपड्यांकडे बघू लागलो.
 माझ्याकडे रोखून पाहत तिनं पुन्हा विचारलं, "काही खरेदीबिरेदी?"
 मोठ्यानं हसून मी उत्तर दिलं, “आम्ही कसली खरेदी करणार सुमित्राबाई? इतरांच्या खरेदीवर आमची कामं होतात!"
 त्याबरोबर तिनं चटकन विचारलं, “तुम्हाला खरंच काही घ्यायचं आहे का?"
 तिचं हे विचारणंही मला आवडलं नाही. अशा रीतीनं माझ्याशी ओळख करून घेणारी, माझ्याशी ओळख वाढवणारी आणि माझ्या पुढं पुढं करणारी सुमित्रा गोखले काही पहिलीच नव्हे. अशा पुष्कळांना मी आपल्या जीवनाचा स्पर्शही होऊ दिला नव्हता. माझ्या कलेच्या विश्वात वावरणारी ही माणसं माझ्या जीवनाचा भाग होऊच शकत नव्हती.
 सुमित्रा गोखलेला मी उत्तर दिलं, "छे: छे: आता मी जे काही म्हणालो त्याचा अर्थ तुम्ही काही खरेदी करून द्यावी असा नाही हं! माझ्या बोलण्यातील ती एक लकब, इतकंच!" आणि 'बरंय, येतो-' असं म्हणून आपल्याच तंद्रीत मी पुढं चालू लागलो.
 या प्रसंगानंतर सुमित्रा गोखले माझ्याकडे नेहमीप्रमाणं येत राहिली. आपल्या सवयीप्रमाणे माझ्याशी बोलत राहिली. साहित्य, संगीत, चित्रपट इत्यादी विषयांवर आमचा अप्रतिहतपणे वाद होत राहिला. असंच बोलता बोलता एक दिवस तिनं मला विचारलं, “तुम्ही 'जॉनी बेलिंडा' पाहिलात का हो?"
 "जॉनी बेलिंडा' हा चित्रपट तेव्हा मुंबईत लागला होता. मी नकारार्थी मान हलवली.
 त्याबरोबर तिनं चटकन विचारलं, “आपण पाहू या का?"
 तिच्या स्वरात एक वेगळीच आर्तता मला जाणवली. तिचे घारे डोळे कसल्या तरी जिव्हाळ्याने चमकू लागले. मला ते सगळं विलक्षण, विचित्र वाटू लागलं. मी लगेच उत्तरलो, "नको! चित्रपट पाहण्याचा मला फारसा शौक नाही."

 ती स्तब्ध राहिली. थिजल्यासारखी बराच वेळ बसून राहिली. मग हळूहळू ती इतर विषयांवर बोलू लागली. 'ती अमकी कथा वाचलीत का हो?' असं तिनं मला विचारलं. त्याबरोबर मध्येच थबकलेली संभाषणाची गाडी पूर्ववत चालू झाली. तन्मयतेनं मीही त्या कथेवर तिच्याशी बोलू लागलो.

लाट । ९३