हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "असे नाही. असेच काही नाही!' शिवा पुन्हा गयावया करून बोलू लागला. “अझीम गेल्यानंतर तिला तसे वाटले. आता नाही वाटत. तुम्ही दोघांनी जरा समजून घ्या सारे-"
 "तिला पैसे हवे आहेत एवढेच ना?"
 "नाही. तुम्ही तिच्याकडे यावे अशी तिची इच्छा आहे. तिचे वागणे समजून घ्यावे-"
 "हट्!" रायबा त्वेषाने उद्गारला, "असल्या यःकश्चित हेंगाड्या बाईचे म्हणणे मला बिलकूल ऐकून घ्यायचे नाही. हमीदला ऐकायचे असेल तर त्याने ऐकून घ्यावे." आणि असे म्हणून तो उठून त्वेषाने तिथून निघून गेला.
 "निदान तू तरी चल." शिवा आवाजात शक्य तितकी अजीजी आणून मला म्हणाला आणि त्यावरून 'ती फारच अडचणीत सापडली असली पाहिजे' एवढे अनुमान काढायला मला वेळ लागला नाही. तिच्याविषयी मला सहानुभूती वाटू लागली. परंतु तसा एकदम होकार देणे माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध झाले असते. म्हणून मी म्हणालो, "मला विचार केला पाहिजे."
 "त्यात विचार कसला करायचा आहे?" शिवाने माझा दुबळा मनोनिग्रह ओळखून म्हटले, "तू तिला भेट तर खरा! म्हणजे माझ्या म्हणण्याची तुला प्रचीती येईल." आणि त्याने मला जवळ जवळ तिच्याकडे चलायची सक्ती केली. त्याच्याबरोबर उठून मी चालू लागलो. तसाच त्याच्याबरोबर तिच्या घरी गेलो. मला तिच्यापुढे ढकलीत तो एक मोठी कामगिरी पार पाडल्याच्या आविर्भावात तिला म्हणाला, “एकाला तरी आणला! आता झाले तुझे समाधान?"
 ती माझ्याकडे पाहून नुसती हसली; काहीच म्हणाली नाही. तिचे पूर्वीचे गुबगुबीत शरीर बरेचसे ओसरून गेले असल्याचे तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले. ती उदास, दुःखी दिसत असल्याचे मला जाणवून आले. परंतु त्या उदासीनतेचे कारण शोधायच्या फंदात मी पडलो नाही. सहज म्हणून मी विचारले, "कसे काय? मजा आहे ना?"
 "नका असं बोलू!" ती आपल्या हेंगाडी स्वरात एकदम भावनावश होऊन म्हणाली. एव्हाना शिवा कुठे बाहेर सटकला आणि तिच्या त्या ताणलेल्या भावनांचा भडिमार मला एकट्याला सहन करावा लागला. तिचा आवाज चिरका बनला; गदगदून बाहेर पडू लागला.
 "मी चुकले!' पश्चात्तापाच्या त्या क्षणाला ती म्हणाली, "आता तुमच्याशी मी अशी वागणार नाही! कधीच वागणार नाही!"
 तिला अशी असहाय झालेली, माझ्यापुढे लोटांगण घालताना पाहून प्रथम मला खूप बरे वाटले आणि मागाहून करुणा आली. "उगाच रडू नकोस!" मी म्हणालो. "मी तर सारे विसरून गेलो आहे." आणि त्या दिवसापासून मी पुन्हा अधूनमधून तिच्याकडे खेप टाकू लागलो.

 परंतु तिच्यात आता फार चमत्कारिक बदल झाला असल्याचे मला जाणवू लागले. ती सदाच गंभीर राहू लागली. उदास दिसू लागली. पूर्वीसारखी मोकळेपणे वागेनाशी झाली.

आम्हां चौघांची बाई । १०५