हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागला. अखेर यथावकाश मी तिच्याशी लग्न केले.
 शिवा लग्नाला आला होता. रायबाही हजर राहिला होता. हे दोघे तर अनेक दिवसांनी त्या निमित्ताने एकत्र आले होते. परंतु दोघे एकमेकांना टाळू पाहत होते! रायबा बेफिकीरपणे एका टोकाला बसून सारख्या सिगारेटी ओढीत होता. शिवा त्याच्या जणू खिजगणतीतच नव्हता.
 शिवा मात्र अस्वस्थ दिसत होता. सारखा बसल्या जागेवरून माझ्याकडे पाहत होता. कधी एकदा हा निकाचा सोहळा संपतो असे त्याला झाले होते. निका संपताच तो माझ्याजवळ आला, तेव्हा मीच म्हणालो, “सॉरी, बायकोची ओळख करून देता आली नाही. ती आत आहे."
 “काही हरकत नाही. पुन्हा भेटेन केव्हातरी! फक्त सांगायचे एवढेच की, मित्रांना विसरू नकोस."
 "अरे वा! कसा विसरेन?" मी वरवर उद्गारलो. परंतु त्याची मैत्री चिरंतन राहावी अशी इच्छा माझ्या मनात नव्हती.
 तो गेल्याचे रायबा बसल्या जागेवरून पाहत होता. मग तो उठून माझ्याकडे आला.
 “अभिनंदन!"
 "थँक्यू."
 “शिवा काय सांगत होता?"
 “मित्रांना विसरू नकोस."
 "आणि त्या हेंगाडणीला?' तो तिरस्काराने म्हणाला, “तुला सांगतोय. तुझे लग्न झालेय. चांगला सुखाने संसार कर! त्या काळीचा नाद सोडून दे!"
 "तुझा उपदेश स्तुत्य आहे. आणि तो पाळायचेही मी ठरवले आहे. नव्हे, आधीपासूनच अंमलात आणला आहे. परंतु तुझ्या बाबतीत मी काय काय ऐकले!-ते सारे खरे आहे?"
 "तंतोतंत खरे!"
 "असे का?"
 "ते असेच असायचे! हे बघ! मी कलंदर मनुष्य आहे. आजवर कुणाच्या बंधनाला मी जुमानलेले नाही. कुठले आदर्श फारसे मानायच्या फंदात पडलेलो नाही. ज्या ज्या वेळी मनाला जे जे पटत गेले त्या त्या वेळी ते ते करीत गेलो आणि पुढेही करीत राहणार-"
 तेवढ्यात माझी बायको दरवाजात येऊन उभी राहिली आणि तो गप्प राहिला. अधिक वेळ न थांबता लगेच तो तिथून निघूनही गेला.
 लग्न झाले आणि माझा संसार सुरू झाला. त्या नवथर काळात मी जगाला विसरूनच राहिलो. माझ्या संसारात मश्गुल झालो. तासनतास बायकोच्या सहवासात व्यतीत होऊ लागले. घरात आणि बाहेर सतत ती माझ्याबरोबर राहू लागली. तिच्या संगतीतल्या रात्री मला पुलकित करू लागल्या.

 त्या दिवसांत काळीशी असलेल्या माझ्या संबंधाच्या आठवणीही मला किळसवाण्या वाटू

आम्हां चौघांची बाई । १०७