हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सबंध चोंडक्यात झंझावाताप्रमाणे पालखी फिरत गेली. मध्येच जणू काय ती थबके आणि कुठे तरी एकदम घुसे. गड्यांवर गडी धडाधड कोसळत. अन् निराशेने सावकाश पालखी जागची उठे. “होऽऽच्या होऽऽ'चा गजर मोठा होई. ढोलांचे आवाज द्रुतगतीनं घुमू लागत. सनयांचे सूर त्यात मिसळत. गुलाल उधळला जाई. पालखी वर्तुळाकार घुमू लागे. देवीची शांत मूर्ती गदगद हलू लागे. पुन्हा पालखी खाली खांद्यावर येऊन संथपणे डुलू लागे.
 हे असं कैक घटका चाललं होतं. जमलेली मंडळी आणि हसनखानही हतबुद्ध झाला. शेरणं कुठं कुचंबलंय कुणाला कळेना आणि पालखीही शेरणं ओलांडून पुढे जाईना. नेण्याचा प्रयत्न करताच विलक्षण जड होई. जवानांचे खांदे तुटून पडत. पाय जणू भुईला चिकटून बसत.
 सांज झाली. काळोख पडत चालला तरी शेरणं निघेना. पालखी नुसती साऱ्या चोंडक्यात घुमत होती आणि तिला घुमवता घुमवता जवानांच्या तोंडाला फेस येऊ लागला. खांदे मोडून पडले. पोटऱ्या वळू लागल्या. खांदा द्यायची शामत उरली नाही, असं म्हणत म्हणत जवान जवान गडी खांदा सोडून धापकन बांधावर बसून दम घालू लागले. बघता बघता रात्र पडली. कुणी तरी गॅसबत्त्या आणल्या आणि त्या उजेडात शेरणं काढायचं काम चालू राहिलं.
 हे सारं बघून हसनखानाचा जीव उडून गेला. अखेरीस इतकं होऊन शेरण निघणार की नाही? त्याच्या नशिबात अवलाद आहे की नाही? त्यानं हात जोडले आणि तो आपल्याशीच पुटपुटू लागला, "हे लक्सुमीबाय, माजा शेरणा काढ-माजा शेरणा काढ, मी तुज्या नावावर बोकड सोडीन. अवलाद झाल्याबराबर त्याला तुला अरपन करीन-"
 आणि इतक्यात पालखी एकाएकी हुंदाडली. आकाशात एकदम उंच उडाली. गड्यांच्या खांद्यांवर येऊन अलगद बसली. पुन्हा ढोलांचा धडाका सुरू झाला. पुन्हा सनईचे सूर घुमू लागले. पुन्हा गुलाल उधळला गेला. पालखी स्वत:भोवतीच एकदम गरगर फिरली आणि तिचा दांडा चोंडक्यात एके ठिकाणी घुसला; पुन्हा मागे आला आणि पुन्हा अधिक वेगाने आदळला! त्या दणक्याने देवीची मूर्ती कोपायमान झाल्यागत जागच्या जागी हलू लागली. गड्यांचे खांदे विलक्षण रीतीने घसपटून निघाले. घटकाभराच्या या प्रकारानंतर, डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच एक नारळ बांधातून अलगद बाहेर पडला. 'महालक्ष्मी होऽ च्योऽऽ'चा गजर झाला! शेरणं निघालं. देवीनं शेरणं काढलं.
 हसनखान बेहोषीत पुढं थांबला. पालखीपुढे जाऊन त्यानं लोटांगण घातलं. सर्वांग गुलालानं माखून घेतलं. त्या खुशीत तिथं तो जमिनीवर पडून गडबडा लोळला.
 पालखी ठाणकावर पोचली तेव्हा दहा वाजले. गडीमाणसं घरोघर परतू लागली. पालखीला खांदा देऊन थकलाभागलेला विश्राम निवाते काळोखात ठेचाळत आपल्या खोपटाकडे निघाला. तेवढ्यात त्याला विसू बामनानं हाक मारली. विसूपाशी कंदील होता. विश्राम थांबला आणि विसू येताच त्याच्याबरोबर चालू लागला.
 वाटेत विसूनं विचारलं, “आज शेरणे निघायला देवीला लईसा वेळ लागला?"

 "व्हय!" विश्राम उत्तरला, 'तसा मला अंदाज होताच कुठं पुरलेलं हाय त्येचा? पण

५० । लाट