हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणूस आणि गाढव


 दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात गावातला दरोबस्त माणूस मुळ्याची भाजी करतो. खाडीकाठच्या मळ्यातून भाजीचं अमाप पीक येतं. चिपळूणची बाजारपेठ जवळच असल्यानं तिथं बरा खप होतो. भाजावणीचं काम सुकर होतं. मानेवर आलेला आगोठीचा बोजा थोडासा हलका वाटू लागतो.
 ही झाली गरीबाची कथा. पण ज्याचा भाऊ आफ्रिकावाला आहे, केपचे पौंड ज्याच्या घरी खुळखुळताहेत, त्याला मुळ्याच्या भाजीवर विसंबून राहण्याचं वास्तविक काहीच कारण नव्हतं. पण माणसाचे दिवस फिरले म्हणजे त्याला कसली उस्तवारी करावी लागेल याचा नेम सांगता येणार नाही.
 म्हणजे अबदुल्ल्याचे दिवस काही इतके फिरले नव्हते. याजी लावलेल्या रकमांवरील याज खाऊन तो चांगलाच गबरगंड झाला होता. आता तिरदळ झाली असली तरी कुळांकडून मक्त्याचं पाच खंडी भात येतच होतं. एका व्यापाऱ्यानं दहा हजारांची रक्कम साफ बुडवली असली तरी व्याजाच्या रूपानं अबदुल्ल्यानं तिची कधीच परतफेड करून घेतली होती. एका रकमेवरील व्याजाचं व्याज बंद झालं असलं तरी घरखर्च काही त्यामुळे अडून बसला नव्हता. तो व्यवस्थित चालूच होता. पण अबदुल्ल्याच्या दृष्टीनं चिंतेची बाब अशी की, मूळ रक्कम वाढत नव्हती आणि घरखर्च मात्र चालू होता; नव्हे एकसारखा वाढत होता. प्रथम त्याच्या नीटसं लक्षात आलं नव्हतं. एके दिवशी त्याला संशय आला. लागलीच त्यानं हिसाब करून पाहिला तो उत्पन्नातून खर्च वजा जाता नगद पाचशे रुपये तूट वरसाला त्याला येत होती. पाचशे रुपये! आणि असंच बसून खायचं म्हटलं म्हणजे केवढीही रक्कम असली तरी उडून जायला या महागाईच्या दिवसांत काय वेळ लागणार होता?

 किमान पाचशे रुपये तरी हमखास निघतील असा काहीतरी धंदा करावा आणि आपली रक्कम त्यात गुंतवावी असा बेत अबदुल्ल्या करू लागला. मुंबईस त्याच्या फुफूचा मुलगा होता. त्याला कागद लिहून त्यानं सलाय घेतली. त्यानं लिहिलं की, 'हटेलसारखा धंदा नाही. एक कोप 'च्या'त तीन पैशे नफो! इचार असल्यास कलव म्हणजे होटल हेरून ठेवता!' अबदुल्ल्याला हा बेत एकदम पसंत पडला आणि होटल पाहण्याविषयी त्यानं लागलीच कळवून टाकलं.

६३