हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिरजोळीच्या पुलाच्या कामावर वडाऱ्यांनी तळ दिला होता. तिथं काही माल त्यानं पाठविला. पण चटणीशी भाकर खायची सोडून अबदुल्ल्याची वांगी विकत घेऊन खपवण्याची त्यांना काही आवश्यकता वाटली नाही.
 दुसऱ्या दिवशी त्यानं सगळ्या खर्चाचा हिसाब केला. एकंदर दोनशे रुपये वांग्यापायी खर्च पडले होते. शिवाय राखणेच्या गड्याची मजुरी रोज जातच होती. आणि विकल्या गेलेल्या वांग्यांचे फक्त बारा रुपये त्याच्या हाती लागले होते! म्हणजे जवळ जवळ सगळा मूळ खर्च अद्यापि वसूल व्हायचा होता. एवढा पैसा कसा वसूल करावा ही त्याला 'रात-दिस' चिंता वाटू लागली. त्याच्या मनानं तोच ध्यास घेतला. डोक्यात वांग्याशिवाय दुसरं-तिसरं काही उरलं नाही.
 आणि अशा चिंतेत असतानाच एक दिवस सकाळचा भाजी काढण्यासाठी म्हणून तो मळ्याकडे गेला. लांबवर असतानाच तो थबकून उभा राहिला. कुंपणाच्या एका बाजूच्या दिशेनं डोळे फाडफाडून तो पाहू लागला. एके ठिकाणी कुंपण मोडूनतोडून पार झालं होतं. त्या मोडलेल्या कुंपणातून संतापलेला अबदुल्ल्या तावातावानं आत शिरला. आणि मोडलेल्या, तोडलेल्या, खाल्लेल्या, उपटून पडलेल्या त्या वांग्यांच्या रोपांतून हिंडत, राखणी झोपत असलेल्या माचापाशी येऊन थडकला.
 रात्री कुणाचं तरी जनावर येऊन मळ्याची नासधूस करून गेलं होतं आणि हरामी राखण्याला त्याचा पत्ताच नव्हता. अबदुल्ल्याच्या अंगाची लाही लाही झाली. राखण्याला त्यानं शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या सतरा पिढ्या उद्धारल्या. कधी नव्हे तो चार पैसे मिळवण्याच्या आशेनं हा धंदा केला आणि नेमका तेव्हाच वांग्यांना दर नाही! त्यात पुन्हा हा काय भानचोद नवा त्रास? हे गाववाले कुणाला सरळ मीठमिरची मिळवू द्यायचे नाहीत!
 त्यानंतर दिवसभर गावात भटकून अबदुल्ल्यानं कसोशीनं तलास केला आणि त्याला कळलं की पुलावरच्या वडाऱ्यांची गाढवं रात्री-बेरात्री सगळा तळ आडवा घालतात.
 त्या रात्री तो स्वत: राखणेस गेला. सर्व तयारीनिशी माचात दबा धरून बसला. नऊ वाजले...दहा वाजले...अकरा! दहिंवर पडू लागलं. माचव्याचं गवत ओलावून गारवा सर्वांगाला बिलगू लागला. झोपेची धुंदी अन् गारव्यातली मादकता यांचा त्याच्यावर आस्ते आस्ते अंमल बसला. त्याला डुलकी येऊ लागली. अन् इतक्यात कुठंतरी गाढवं ओरडली. तो टाणकन उडाला. हातात कंदील घेऊन वेड्यासारखा सैरावैरा धावत सुटला. त्या कंदिलाच्या हलत्या-धावत्या प्रकाशात नीट न दिसून एका गाढवावर जाऊन आदळला. त्याबरोबर त्या गाढवानं अबदुल्ल्याला चार-पाच सणसणीत लाथा हाणल्या! अबदुल्ल्या धाडकन आडवा कोसळला आणि गाढवं निघून गेली.
 धडपडत तो उठला. माचात परत आला. रात्रभर मग डोळे ताणून राखण करीत बसला. पण त्यानंतर मळ्याकडे कोणी फिरकलं नाही.

 दुसऱ्या दिवशी गाढवं पकडायचीच या निश्चयानं तो रात्री मळ्यात गेला आणि जेव्हा गाढवं मळ्यात आली, तेव्हा राखण्याच्या मदतीनं त्यानं ती शिताफीनं पकडली. रात्रभर बांधून

माणूस आणि गाढव । ६५