हे पान प्रमाणित केलेले आहे.

रोखच बदलला! अबदुल्ल्याच्या मळ्यात यायच्या ऐवजी ती बाजूच्या अहमद शफीच्या मळ्यात घुसू लागली. एक-दोन दिवस अबदुल्ल्यानं हे मुकाट्यानं सहन केलं, पण स्वत:च्या नुकसानीच्या आणि अहमद शफीच्या नफ्याच्या अशा दोन्ही कल्पनांनी त्याला हैराण कल. तो एका रात्री हळूच अहमदच्या मळ्यात गेला आणि तिथली गाढवं हाकलून त्यानं आपल्या मळ्यात आणून बांधली. पुन्हा त्या दिवशी त्याला एकदम दहा रुपये मिळाले. दुसऱ्या दिवशीही असाच गाढवं आणण्याचा त्याचा गुप्त कार्यक्रम पार पडला. पण तिसऱ्या खेपेला अहमद शफीच्या सावधानतेमुळं त्याला ते जमलं नाही. उलट तो अहमदच्या मळ्यातली गाढवं रोजच्या रोज हाकलून आपल्या मळ्यात नेतो, एवढी गोष्ट मात्र शाबीत झाली. अहमद शफी भडकून ओरडला, "गाढवचोर कुठचे!" अबदुल्ल्यानं दंड चढवले. दोघांनीही मारामारीचा अभिनिवेश आणला आणि दोघांनाही लगेच कळून चुकलं की, वडाऱ्यांच्या गाढवांवरून आपण मारामारी करण्यात काय अर्थ आहे? त्यांनी अशी तडजोड केली की, दोघांनी दोघांच्या मळ्यातली गाढवं पकडायची आणि येईल तो पैसा सारखा वाटून घ्यायचा. गाढवं पकडायचीच तर सगळ्या तळातली का पकडू नयेत असा रास्त आणि व्यापक युक्तिवाद अबदुल्ल्यानं केला; पण “अपुन हे पाप करणार नाय" असं 'तोबा तोबा' करून अहमद शफीनं उत्तर दिल्यामुळे अबदुल्ल्याला तो व्यापक विचार तेवढ्यापुरता तरी सोडून द्यावा लागला.
 आणि भागीतही हा धंदा तेज चालला! इतका तेज की, गाढवामागं दोन रुपये सहज फेकून देणारे वडारीही आता चिंताक्रांत दिसू लागले. परभारे तळात गाढवं सोडल्यानं इतरांची धूळधाण होण्याऐवजी त्यांच्याच कमाईची धूळधाण होऊ लागली! आणि अबदुल्ल्यानं गाढव पकडण्याचं सत्र सुरू केल्यापासून हा रोग दरोबस्त मळेवाल्यांत झपाट्यानं पसरू लागला. किंबहुना गाढवं पकडून दंड वसूल करण्यासाठी त्या साऱ्यांनी एखादी गुप्त संघटना सुरू केली असा देखावा मात्र निर्माण झाला!
 वडारी हवालदिल झाले खरे. पण हवालदिल होऊन ते काय करणार होते? गाढवांना आपल्या पालापाशी बांधून ठेवून खायला घालण्याचं त्यांच्या बापजाद्यांनाही कधी ठाऊक नव्हतं. आणि गाढवांकडून कामं करून घ्यायची म्हटली म्हणजे त्यांना काहीतरी खायला हे द्यायलाच हवं होतं. आता काही दिवस, मातीचं काम आहे तोवर हा दंडाचा त्रास काय होईल तो सहन करावयालाच हवा असा सुज्ञ विचार करून वडाऱ्यांनी गाढवांना तसंच मोकाट सोडलं. अखेर गाढवं ती गाढवंच! बाकीचे मळे सोडून ती पुन्हा पुन्हा येऊन अबदुल्ल्याच्याच मळ्यात घुसू लागली आणि गबरगंड अबदुल्ल्याला अधिकच गबरगंड करू लागली! या काही दिवसांतच अबदुल्ल्याला एकूण दोनशेचार रुपये एवढा प्रचंड नफा वडाऱ्यांच्या गाढवांवर झाला होता.

 पण एक दिवस...एक दिवस अगदीच अनपेक्षित गोष्ट घडली. त्या रात्री अबदुल्ल्याच्या मळ्याकडे एकदेखील गाढव फिरकलं नाही; इतकंच नव्हे तर सबंध तळात त्याला औषधालाही गाढव आढळलं नाही. गेल्या काही दिवसांच्या कमाईवरून भावी प्राप्तीचे काही

माणूस आणि गाढव । ६७