हे पान प्रमाणित केलेले आहे.

आडाखे त्यानं मनाशी बांधले होते, ते पाहता पाहता पार धुळीला मिळाले. गाढवांनी अखेरीला गाढवपणा केला! अद्याप त्याला दीडशेची तरी तूट येत होती. तेवढी भरून यायला हवी तर पंधरा दिवस तरी गाढवं अशीच त्याच्या मळ्यात न चुकता यायला हवी होती.
 दुसऱ्या रात्री हवालदिल मनानं तो मळ्यात बसला. गाढवं आता येतील, मागाहून येतील, असं सारखं त्याला वाटे. कुठं जरा कसला आवाज झाला की तो गाढवांच्या ओरडण्याचाच आहे असा भास होई. आणि जेव्हा गाढवांची नेहमीची येण्याची वेळ टळून गेली तेव्हा त्याचा धीर सुटला. तो सावकाश जागचा उठला. एक जाडशी काठी त्यानं हातात घेतली. दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि अनवाणीच अहमद शफीकडे चालत जाऊन त्याला त्यानं विचारलं, “वडाऱ्यांची गाढवं कुठं असतात?"
 “मिरजोळीच्या पुलावर" त्याच्या प्रश्नाचा रोख न समजून अहमद शफी उत्तरला, “पण का?"

 "त्यांना मळ्यात हनया जाताय!"-एवढेच शब्द संथपणे अबदुल्ल्या बोलला आणि पाचशेची खोट भरून यावी म्हणून थंडीत सर्वांगाला कापरं सुटलेला, हातात कंदील आणि काठी घेतलेला अबदुल्ल्या, आपल्या मळ्यात घालण्यासाठी म्हणून गाढवं शोधण्यासाठी तळ तुडवीत अनवाणी मिरजोळीच्या पुलाच्या दिशेने चालू लागला...

६८ । लाट