पान:लोकमित्र १८९५.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )

जो आपला पगडा बसविला आहे, तो दूर झुगारून द्या आणि आपल्या पूर्वजांनीं केलेल्या अलौकिक कृत्यांचे स्मरण करा. तुम्ही त्यांचे वंशज आहां. असे कुचकामी ठरूं नका. याउप्पर तुमची लढण्याची मर्जी नसेल, तुमचे अंगीं नामर्दपणा शिरला असेल, व वीरबच्चे म्हणवून - घेऊन धारातीर्थी स्वामिकार्याकरितां देह ठेवण्याची लाज वाटत असेल, तर अचलांनों, मला तुमचेप्रमाणे बनायचे नाहीं हें पक्के समजा ! भीरु ह्मणवून घेण्याकरितां माझा जन्म नव्हे अशी मनांत पक्की गांठ मारा ! आणि उदईक मला तोफेचे तोंडी बांधून माझे डोकें तरी किल्ल्यांत पाडा व परत जा. आणि जर तुमचें वीर्य अद्याप कायम असेल तर किल्ला सर केल्याशिवाय येथून हालणें नाहीं अशा शपथा वहा. "
 हें आवेशाचें बोलणें ऐकिल्याबरोबर एखाद्या अधू मनुष्यासही जोम येईल मग तेथें जमलेली तर मोठमोठी रणशूर मंडळी, त्यांचेवर इष्ट परिणाम का होणार नाहीं ? अर्थात झालाच पाहिजे. त्या मंडळीचे चेहऱ्यावरील तें निराशेचें अशुभ स्वरूप नाहींसें होऊन त्यावर टवटवी दिसूं लागली. त्यांचे हस्त पुनः स्फुरण पावूं लागले. त्यांचे नेत्रांत वीरश्रीर्चे तेज चमकूं लागलें व सर्व जणांनी उठून आप्पांचे सांगण्याप्रमाणें कबूल करून त्याप्रमाणें दृडतर प्रतिज्ञा केली आणि सर्वानुमतें किल्ल्यांतील प्रथम भेद आणून मग हल्ला करावा असें ठरलें आणि त्याप्रमा- णें तेथल्या तेथेच खंडोजी माणकर, अंजुरकर व मोरे या सरदारांस अनुक्रमे गुराखी, सुतार व कांसाराचे वेषा- नें किल्ल्यांत पाठवावें आणि त्यांनी हरप्रयुक्तीनें किल्ल्यांतील भेद आणावा असें ठरवून त्या कामावर त्यांची योजना केली.