पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथे : १०१

शेवटी दण्डसत्तेला देश बळी पडतो. म्हणजे आज कसें विपरीत दृश्य दिसतें आहे तें पाहा. आपण लोकशाही च्या घोषणा करीत आहों. पण आपला सर्व राज्यकारभार भ्रष्ट व धर्मशून्य झाल्यामुळे, कायद्याचें (म्हणजेच धर्माचे) राज्य येथून नष्ट होत चालल्यामुळे, अधिकारी, सत्ताधारी, नेते हे मदांध व सत्तालोलुप झाल्यामुळे आपण दण्डसत्तेकडे वाटचाल करीत आहों. तिकडे सोव्हिएट रशिया व नवचीन दण्डसत्तेच्या घोषणा करीत आहेत. पण त्यांनी विज्ञानाची उपासना चालविली आहे. लोकांत शास्त्रज्ञानाचा प्रसार ते करीत आहेत. भ्रष्टता, चारित्र्यहीनता यांचा नायनाट करून जनतेला दण्डसत्तेनेच का होईना; ते शुद्ध आचारविचारांची शिकवण देत आहेत; आणि प्रचंड उत्पादन करून सुखसमृद्धि निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत आहेत; आणि ही सुखसमृद्धि व तें शास्त्रज्ञान यांतून व्यक्तित्व व लोकशाही यांचा उदय झाल्यावाचून राहणार नाही अशी वेंडेल विल्की, जॉन गुंथूर आणि खुद्द पंडित जवाहरलालजी यांसारखे लोकशाहीचे कट्टे पुरस्कर्तेच ग्वाही देत आहेत. भारत हा लोकशाहीच्या मार्गाने दण्डसत्तेकडे- कम्युनिझमकडे चालला आहे, आणि नवचीन दण्डसत्तेच्या कम्युनिझमच्या मार्गाने लोकशाहीकडे चालला आहे !
 असें कां व्हावें ? अशी विपरीत गति का निर्माण व्हावी ?
 याच प्रश्नाचे उत्तर आपण शोधीत आहों याच विषयाचा प्रपंच करीत आहों. 'क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे' या कविवचनांत त्याचें उत्तर सापडेल.
 यश हें समाजाच्या अंगच्या सत्त्वावर अवलंबून आहे; बाह्य उपकरणांवर नाही. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटले आहे की, "इतिहासाच्या प्रगतीला समाजांतील कर्त्या पुरुषांच्या बुद्धिमत्तेपेक्षा चारित्र्याची जास्त आवश्यकता आहे. चारित्र्याचें महत्त्व जास्त आहे; आणि बौद्धिक क्षेत्रांतलें कर्तृत्वहि बह्वंशी चारित्र्यावरच अवलंबून आहे." यावर भाष्य करतांना सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ क्रोधर यांनी 'चारित्र्य' याचा अर्थ स्पष्ट केला आहे. ध्येयनिष्ठा, दृढनिश्चय, असीम सत्यनिष्ठा, सत्याच्या रक्षणासाठी आवश्यक ती निर्भयवृत्ति, समाजहितबुद्धि, अंतिम उद्दिष्टासाठी बलिदान करण्याची सिद्धता या गुणसंपदेला कोथर चारित्र्य असें म्हणतात. हाच धर्म, हेंच सत्त्व ! आइन्स्टाईन व क्रोधर यांनी हें विज्ञानाच्या इतिहासाविषयी लिहिलें आहे.