पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण : ७

भारताचें अध्यात्मनिष्ठ परराष्ट्रकारण



 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय प्रपंचांत भारताने जें तत्त्वज्ञान स्वीकारलें आहे त्यामुळे हा देश दिवसेंदिवस ऱ्हास पावत आहे, त्याचा शक्तिपात होत आहे, त्याची संघटना भंग पावत आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कोणत्याहि समस्या सोडविण्यांत त्याला यश येत नाही, या विचाराचा प्रपंच गेल्या दोन प्रकरणांत केला. राष्ट्रनिष्ठा व धर्मनिष्ठा या दोन महाशक्ति समाजाला थोर कार्याला प्रवृत्त करीत असतात. पण या दोन्ही बाबतीत आपल्या नेत्यांनी अत्यंत भ्रामक, अवास्तव व घातकी तत्त्वज्ञान स्वीकारले आहे, आणि त्यामुळे राष्ट्रीय जीवनांतील चैतन्य नष्ट होऊन भारतीय समाजाला अवकळा प्राप्त झाली आहे. आश्चर्य असे की, दण्डसत्तांकित देशांनी त्यांचे मूल तत्त्वज्ञान या दोन्ही निष्ठांच्या विरोधी असूनहि समयज्ञता दाखवून आपले धोरण बदललें आणि या महाशक्तींचा आश्रय करून आपापले समाज बलशाली व सामर्थ्य संपन्न केले. पण यांत आश्चर्य तरी कसलें ? समाजाच्या उद्धारासाठी तत्त्वज्ञान (जुन्या भाषेत धर्म) असतें, तत्त्वज्ञानासाठी समाज नसतो, 'नियमन मनुजासाठी, मानव नसे नियमनासाठी,' हें त्यांनी जाणलें आहे.

प्रभवार्थाय भूतानां धर्मस्य नियमः कृतः ।
यः स्यात् प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ॥

 असें धर्मरहस्य भगवान् श्रीकृष्णांनी महाभारतांत सांगितले आहे. पण हे महासत्य आकळण्याची ऐपतच भारतीय नेत्यांच्या ठायीं नाही. आपल्या परराष्ट्रकारणांत आपण सारखे अपयशी होत आहों याचें हेंच कारण आहे. पंचशील, अहिंसा, विश्वशांति, तटस्थता या तत्त्वांवर पंडित जवाहरलाल