पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २२७

विस्तार फ्रान्सच्या दुप्पट होता आणि त्यामुळे माँटेस्कसारखे युरोपातले लोकसत्तेचे पुरस्कर्तेहि म्हणू लागले की, इंग्लंडचें ठीक आहे, तो लहान देश आहे; पण अमेरिकेसारख्या मोठ्या देशांत लोकशाही कधीच यशस्वी होणार नाही. वॉशिंग्टनने अध्यक्ष न होतां राजा व्हावें असें म्हणणारा अमेरिकेतहि एक पक्ष होता; पण त्याने हें मत मानले नाही आणि लोकशाहीचाच अंगीकार केला. जर्मनीचा महाराणा फ्रेडरिक यानेहि ही लोकशाही टिकणार नाही असेंच भविष्य त्या वेळी सांगितले होते; पण पुन्हा एकदा अमेरिकनांनी या मताचा निरास केला. अमेरिकन राष्ट्र उत्तरोत्तर बलाढ्यच होत गेलें.
 पण यानंतरहि पाश्चात्त्यांमधील लोकशाहीबद्दलचा अविश्वास नष्ट झाला असें नाही. उलट, मेक्सिको, दक्षिण अमेरिका, जर्मनी, फ्रान्स येथे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या घटना घडल्या त्यामुळे तो अविश्वास बळावतच चालला. १८२१ च्या सुमारास मेक्सिको आणि ब्राझील, वेनेजुवेला, पेरू, चिली इत्यादि दक्षिण अमेरिकेतील देश यांवरील स्पेनचें वर्चस्व नष्ट झाले आणि मग तेथील नेत्यांनी आपापल्या देशांत ब्रिटनचे अनुकरण करून लोकसत्ताक शासनें स्थापन केली; पण या वेळी लोकांच्या सर्व शंका खऱ्या ठरल्या. लोकशाही म्हणजे दुही, दुफळी, अराजक, यादवी, बेबंदशाही, अंदाधुंदी हे समीकरण या देशांनी खरें ठरविलें. अजूनहि तेथे तेंच समीकरण बरोबर आहे, आणि हें पाहून राजसत्तावादी लोक म्हणाले की, 'पाहा, आमचे मतच बरोबर आहे. लोकशाही म्हणजे अराजक, लोकशाही म्हणजे दौर्बल्य, लोकशाही म्हणजे नाश हेंच खरें आहे.' इंग्लंडमध्ये लोकशाही यशस्वी झाली हा एक योगायोग आहे. अमेरिकेत ती यशस्वी झाली हें निराळें प्रमाण होऊं शकत नाही. कारण ब्रिटिश लोकच तेथे गेलेले आहेत. दैवयोगाने त्यांना हे जमले, पण म्हणून इतरांना ते जमेलच असे नाही. त्यांनी लोकशाहीच्या वाटेस जाऊं नये हेंच खरें. तसें त्यांनी केलें तर अराजक, यादवी, दौर्बल्य, परकीय आक्रमण, स्वातंत्र्यनाश या आपत्ति त्यांच्यावर ओढवल्यावांचून राहणार नाहीत.
 याहि गोष्टीला आता शंभर-सव्वाशे वर्षे झाली, आणि आशियांतील नव्यानेच उदयाला येणारे देश पुन्हा एकदा तें समीकरण बरोबर असल्याचा