पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४६ : शतपत्रे

 (९) तंत्र-शास्त्राचे आधाराने चालणारे एक शाक्त मत आहे. यातील लोक फार दुष्ट आहेत. हे बंगाल्यात पुष्कळ आहेत व हल्ली महाराष्ट्र देशात यांचा पर्वकाळ पुष्कळ झाला आहे. यामल इत्यादि ग्रंथ आहेत. त्यात रुधिराध्याय म्हणून आहे. त्यात शक्तीस भक्ष कसकशाचा द्यावा, हे लिहिले आहे. ते जर कोणी वाचून पाहिले, तर तो आश्चर्य करील व त्याचा लिहिणारा खाटिकाहूनही निर्दय आणि लोकांस मूर्ख करणारा होता असे म्हणेल. वारुणीप्राशनाचा त्यांस किमपि निषेध नाही व अंगपूजा म्हणजे स्त्रीचे आराधन त्यात श्रेष्ठ धरिले आहे. याहून ईश्वरास क्रोधकारक दुसरे काय असावे ? हे मत कोणी खरे मानणार नाही. मनुष्याचे बुद्धीस इतकी काळिमा येऊन ते ईश्वरास सोडून तंत्रांत लिहिल्या मार्गास लागले. आणि इतक्या निर्लज्जपणास व ईश्वरास क्षोभकारक अशा वर्तणुकीस लागले, हे पाहून दुःख वाटते. अस्तु.
 असे हे पृथक् पृथक् धर्म आहेत व याशिवाय आणखीही किती एक आहेत. परंतु हिंदुस्थानात जगन्नाथास व गिरीस सर्व जातीचे लोक सर्व धर्मविचार सोडून खातात व पितात. गिरीस देवळात मात्र असे चालते आणि जगन्नाथात सर्व गावांत याप्रमाणे वर्णसंकर करीतात. जगन्नाथाचे मूळ असे आहे की, श्रीकृष्णांनी देह ठेविल्यानंतर तो देह जगन्नाथास आणिला व मूर्ती करून त्यात त्या देहातील अस्थी भरल्या आणि त्या मूर्तीस देवळात ठेविले. कोणी म्हणतात की, प्राचीन हिंदू राजे यांनी ही मूर्ती बसविली आहे. असो. याचे मूळ काय असेल ते असो, परंतु जातीचा विचार त्या ठिकाणी नाही. हे जगप्रसिद्ध आहे.

♦ ♦


विधिनिषेधरूप धर्माचे मूळ

पत्र नंबर २८ : ३ सप्टेंबर १८४८

 धर्मशास्चे व नीतिशास्त्राचे मूळ काय आहे, याचा विचार करता दिसते की, प्रथमतः ईश्वराने पृथ्वी निर्माण केली व सर्व सृष्टीतील पदार्थ, सूर्य, चंद्र इत्यादी केले आणि नंतर मनुष्य उत्पन्न केला. तेव्हा प्रथम जो मनुष्य होता, तो सुखी असेल; कारण त्याचे कुटुंब एकटेच. सर्व सृष्टीचा धनी तोच. नद्या, जमीन, झाडे या सर्वांचा अधिकारी तो एकच. तेव्हा तो पाहिजे तेथे रहात असेल. जेथे पाहिजे तेथे बसत असेल. जेथे पाहिजे तेथे पेरीत असेल. त्या