पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे: २३७

त्याजपासून चार रुपये काढतात. कुंभारास म्हणतात आव्याची पूजा केली, म्हणजे विटा चांगल्या निघतात. आणि शेतकरी कुणब्यास म्हणतात की, तुझ्या दाण्याची रास करून तिची पूजा करावी, म्हणजे बरकत येईल. याप्रमाणे लूट आणि कपट करतात. वास्तविक पाहिले, तर कुळंबी, माळी वगैरे अडाणी व नीच जातीचे लोकांस खरा धर्म व खरी नीती सांगावी आणि ढोंग व अज्ञान काढून टाकावे; परंतु ते बळेच त्यांस अज्ञानात ठेवतात. आपला चरितार्थ नीट चालावा व लोकांनी आळशांस खावयास द्यावे, इतकाच त्याचा हेतू आहे. ब्राह्मणांचा पक्ष घेतला, परंतु त्या पक्षास बळ नाही. कर्नाटकातील स्वामी व आचार्य हे दिवसास लूट करतात, व लोकांस ठकवितात. मुद्रा देत जातात आणि अज्ञानी लोक त्यांस मान्य करतात आणि आचार्यांचे व स्वामींचे ज्ञान पाहिले, तर मुद्रेने मोक्षास नेणार व पैशाने स्वर्ग दाखविणार, ही त्यांची मते किती खोटी आहेत, हे सहज समजते.

♦ ♦


धर्मव्यवहारासंबंधी खोट्या समजुती

पत्र नंबर ७३: २ सप्टेंबर १८४९

 सांप्रत हिंदू लोकांमध्ये ज्या वेड्या समजुती आहेत त्यांचे मूळ बहुतकरून हेच आहे की, पुराणे वगैरे जे ग्रंथ आहेत त्यात जे लिहिले आहे त्याचा अर्थ यथास्थित व वास्तविक रीतीने कोणी समजत नाहीत व कवीचा भाव जाणत नाहीत. अर्थाचा अनर्थ करतात. याची उदाहरणे,
 लंका सोन्याची म्हणून वर्णन केले आहे, परंतु त्याचा अर्थ इतकाच की, तेथील लोक द्रव्यवान होते. केवळ तेथील भूमी व घरेदारे सोन्याची होती हा अर्थ नव्हे. परंतु लोक अज्ञानी असल्यामुळे सोन्याचीच लंका होती असे समजतात व त्यांस सहायभूत अलीकडील काही किरकोळ कवि जे झाले, त्यांनीही खरा अर्थ काढावयाचा सोडून ते लोकांचे मताचे पोषण करीत गेले. त्यामुळे अडाणी लोकांच्या समजुती दृढ झाल्या. अमृतराय, मोरोपंत हेही आपले कवितेमध्ये लंका सोन्याची होती, असे वर्णन करतात. त्यापेक्षा हेच खरे, असे लोक म्हणतात. कोठे पुराणात असे लिहिले आहे की, कलियुगात भूमी मृत्तिकारूप