पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३८: शतपत्रे

आहे, तशी पूर्वी नव्हती. मागे कृतियुगी सुवर्णाची भूमी व त्रेतायुगी रुप्याची भूमी व द्वापारात ताम्रभूमी होती; परंतु याचा अर्थ इतकाच घ्यायचा की, त्या त्या काळी, कवींच्या मते लोक त्या मानाने सुखी व धनवान होते. केवळ सोन्याचीच भूमी होती असे नव्हे. सारासार विचार पहावा, तो पहात नाहीत आणि पुराणिकही वेड लावण्याजोगे अर्थ करून सांगतात. त्याजमुळे खरेखुरेच लोक वेडे झाले आहेत.
 शास्त्रात पाहिले तर ठीक आहे, व त्याचे हेतू व त्या वेळची व्यवस्था व काळ पाहून निर्णय केला पाहिजे. तेव्हा ब्राह्मण हे रानात रहात होते. त्या समयी त्यांस जोडे द्यावे असे लिहिले आहे, ते ठीक आहे; कारण की सर्व काम सोडून विद्या करण्याकरिता रानात ते जाऊन बसतात, त्याचे चालविणे आवश्य आहे. आणि असे ब्राह्मण होते त्या काळी इच्छा भोजन, गृहदान, वर्षभर दाणापाणी व अर्घ्यपादप्रक्षालन हे सर्व ठीक होते, कारण की, ब्राह्मणांमध्ये कोणास अन्न मिळत नव्हते, तेव्हा शहरचे व्यापारी, उदमी व राज्यकर्ते यांनी जर त्यांस न द्यावे, तर त्याचे कसे चालेल? परंतु ते ब्राह्मण कसे होते की, व्यासासारिखे, आणि अठरा अठरा पुराणे लिहिली. केवढा त्यांचा उद्योग म्हणावा? किती एक ग्रंथ केले! वेदाचा शोध लावून ते एकत्र जमविले! शाळा घातल्या! व ज्ञानवृद्धी केली! असो. ती ज्ञानवृद्धी बरी की वाईट, परंतु त्या काळी बरी होती. कारण त्या काळी लोक अगदी मूर्ख होते, म्हणून नाना प्रकारचे धर्म कोणीकडून ब्राह्मणांचे चालावे आणि विद्यावृद्धी सदोदित व्हावी, ही तजवीज त्यांणी केली.
 परंतु जेव्हा ब्राह्मणांस समजले की, आम्हास द्यावे हा धर्म लोकांस कळला; आणि त्यांचा हेतू सर्व लोक विसरले, हे पाहून ते रानातून उठोन गावात आले व पोथ्या बांधून ठेवू लागले. व वेद पाठ करू लागले. अर्थ टाकला व पशूसारखे झाले. परंतु आता लोकांनी पहावे की, अशा ब्राह्मण लोकांस पैसा देण्यास योग्य नाही. हे आळसाचे सागर आणि अज्ञानाचे रक्षक झाले. कारण अज्ञान टाकून त्यांचा परिणाम नाही. जर अज्ञान मोडावे तर त्यांचा पैका बुडतो. व ते उपाशी मरतात. व त्यांस सरकारची उपजीविका काही नाही. याजमुळे त्यांस हे मूर्खपण रक्षण करणे जरूर झाले. परंतु लोकांचे डोळे उघडून वास्तविक दान कोणते ते समजतील. तेव्हा भटांचा थोरपणा सहज मोडेल. परंतु बहुत लोक अद्यापि भटांचे नादी लागले आहेत. व पाठ म्हणण्याकडे द्रव्य जाते ते व्यर्थ जाते, त्याचा उपयोग होत नाही, याजकरिता विचार करून पहावा, व शास्त्रात जरी काही लिहिले असले तरी त्याचा हेतू