पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४०: शतपत्रे


ब्राह्मणांचा लोभ

पत्र नंबर ७५: १६ सप्टेंबर १८४९

 ब्राह्मण लोक यांची अलीकडची बुद्धी कशी आहे, याचे उदाहरणार्थ मी तुम्हास एक प्रमाण लिहून कळवितो.
 पूर्वी होळकरांनी व बाजीरावाचे बंधू अमृतराव यांनी पुणे शहर लुटून लोकांस मारिले व पीडिले. त्यात किती एक मुले व बायादेखील ठार मेल्या व किती एक बायांनी जीव दिले. याप्रमाणे द्रव्य हरण केले. लोकांस राखेचे तोबरे दिले आणि कानात आणि बेंबीत बंदुकीची दारू घालून उडविली. धुऱ्या दिल्या. तक्त्यात माणसे पिळली. तवे तापवून त्यांजवर उभी केली व तेल कढवून पोरांच्या देखील अंगावर शिंपले. इतके करण्याचा हेतू की, लोकांनी लवकर पैसा द्यावा. तेव्हा किती एक निर्धन होते, त्यांस असे केल्याने ते मरण पावले. असे नाना तऱ्हेचे अन्याय व निर्दयपणाची व्यवस्था जो राजा म्हणवीत होता, त्यानेच केली आणि असे अन्यायाचे द्रव्य चार कोटी रुपये घेऊन अमृतराव काशीस पळून गेले.
 तेव्हा तेथील ब्राह्मणांनी हा पुष्कळ द्रव्य घेऊन आला आहे, याचे हरण कसे होईल, याविषयी तजवीज योजिली. आणि त्यांस जातीत न घेण्याचा मनोरथ दर्शविला. आणि त्यांस कळविले की, तुम्ही अन्यायाने द्रव्य आणले आहे. याजकरिता तुमचे पंक्तीस भोजन कोणी करणार नाही. तेव्हा अमृतराव हा मूर्खाचा शिरोमणी होता; त्याने त्याचे भय मानिले. मग ब्राह्मणांनी सांगितले की, हे तुम्ही जे द्रव्य आणिले आहे, त्यापैकी निम्मे ब्राह्मणद्वारा धर्मादाय करावे, म्हणजे तुम्ही जातीत याल. तेव्हा त्याचे बोलणे कबूल करून त्याने मोठा धर्मादाय ब्राह्मणभोजने, अन्नछत्रे, यज्ञ व नाना प्रकारची दाने काशीस केली. मग ब्राह्मणांनी त्यांस जातीत घेतले व त्याची स्तुती करू लागले. आणि तो दुष्ट अमृतराव सर्व प्रकारे शुद्ध केला.
 आता याविषयी विचार केला, तर ब्राह्मण हे किती नीच व दुष्टाचा प्रतिपाल करणारे आहेत, हे सहज लक्षात येते; कारण की, ज्या दुष्टाने द्रव्य अन्यायाने मिळविले, तो ब्राह्मणांस द्रव्य दिल्याने शुद्ध झाला कसा? जर त्या ब्राह्मणांनी असे सांगितले असते की, हे द्रव्य ज्याचे ज्याचे आणले आहे, त्यांस व्याजासुद्धा परत पाठवावे, आणि आम्हास यातील काही एक नको,