३२० : शतपत्रे
काम करण्यात माहितगार आहेत असे नाही. ते विद्वान, शहाणे व निःपक्षपाती आहेत हे खरे, पण देशाची व भाषेची माहिती नेटीव लोकांप्रमाणे त्यांस नाही. यामुळे नेटीव लोक जे त्यांचे हाताखाली आहेत यांचे हाती रयतेचे वाईट बरे करावयाचे पुष्कळ असते. गरीब लोकांस साहेबांची भेट किंवा त्याशी स्वस्थपणाचे भाषण होत नाही. तेव्हा त्यांस कामगार हेच साहेब असतात. आणि हे कामदार लोक वाईट चालीचे, आशाबद्ध व द्रव्यलोभी असतात. म्हणून लोकांस फार छळितात. त्यातून एखाद्याचे अपराध बाहेर दृष्टोत्पत्तीस येऊन त्यांस शासन होते, परंतु तसे सर्वांस होत नाही. नेटीव लोक महान धूर्त आहेत म्हणून त्यांचे अपराध सापडणेही फार कठीण आहे. साहेब लोक मोठे काम ज्यास देतात त्याची हुषारी मात्र पाहतात. परंतु कामगाराचे फक्त हुशारीचा उपयोग काय?. तीशिवाय दुसरे बहुत गुण त्यांस पाहिजेत. मनुष्य कृत्रिम अंतःकरणी व तोंडापुढे चांगले बोलणारा व इकडे तिकडे धावून आर्जवासाठी काम करणारा, तो समक्ष मेहनत घेतो, त्यामुळे इंग्रज लोकांस वाटते की, हा फार चांगला हुषार आहे, परंतु त्याचे अंतःकरण मलिन व त्यांस धर्मशास्त्र कळत नाही. त्याचा दुष्टपणा हृदयात असतो. तो साहेबाने तोंड मागे फिरविले की पुरे, लागलाच प्रगट होतो. तेव्हा असे प्रकारचे लोक अधिकारावर नेमल्यावर मग त्याचे सद्गुण ऐकावयाची आशा कोठून? परंतु तेणेकरून सर्व जातीस बट्टा लागला असे नाही. नेमणाऱ्यांचे अलक्ष यामुळे या गोष्टी घडतात. पुण्यात बहुत संभावित ब कुलीन व सरंजामदार व पेन्शनवाले गृहस्थ आहेत. परंतु त्यातील चांगला मनुष्य आणि विद्वान आजपर्यंत कामावर कोठे ठेवला असे जाहले नाही. शाळेतील शिकलेले, कुलीन व विद्वान यांचेविषयी तर सरकारने बहुत वेळ हुकूम पाठविले आहेत. परंतु जिल्ह्यातील साहेब लोक या सर्वांस एकीकडे ठेवतात. आणि आपले कृपेतील एखादा मनुष्य त्याचे कुलशील चांगले नसले व अगदी कवडीचा माल असला, तरी त्यांस ठेवून 'रजाचा गज' करतात व याप्रमाणे कुलहीन लोक इंग्रजांचे दरबारात फार जमले आहेत. त्यामुळे ब्राह्मण लोकांची अब्रू कमतर दिसते, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे, याची तजवीज कोणी मनात आणीत नाहीत. साहेब लोक मनास येईल तसा दोष ठेवतात हे ठीक नाही. राजाने खराब लोक सन्निध केले तर कारभार चांगला कसा होईल? मागे कारभार अशा रीतीने चालत नव्हता व माधवराव पेशव्यांचे वेळचे किती एक गोष्टी ऐकण्यात आहेत, त्याजवरून दिसते की, ब्राह्मण लोक सगळे वाईट आहेत असे नाही. बाजीरावाचे कारकीर्दीत बहुतेक ब्राह्मणांस नीचत्व येऊन ते दुर्गुणी झाले हे खरे आहे. तत्रापि अद्याप न्यायनिष्ठुर व योग्य असेही पुष्कळ आहेत.