पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे: ३७९

धरावा हे वाटते, व पक्षपात करावा हे वाटते, व फौजेस कवाईत पाहिजे, हे वाटत नाही. सुधारणा काय पाहिजेत, हे माहीत नाही; व्यापारवृद्धी होण्याची रीती ठाऊक नाही; अशा लोकांस चाकरी कशी देतील? ज्या काळी हे लोक सुधारतील, त्या वेळी खचित त्यांस मोठ्या चाकऱ्या देतील.
 या लोकांस सरकार म्हणजे लोकांचा कारभार करणारे आहेत, त्यात अन्याय केले, तर सर्व लोकांचा घात होईल, हे त्यांस वाटत नाही; सरकारास लुटावे, सरकारचा पैसा खावा, सरकारचे काम जहाले तर जहाले, न जहाले तर न जहाले असे त्यांस वाटते; अशा लोकांस मोठी चाकरी काय उपयोगी? यास्तव हे लोक सुधारल्यावर त्यांस अधिकार देण्यास कमी करणार नाहीत हे लोकांनी पक्के समजावे. याजकरिता सरकारचे कृपेस पात्र होण्याची इच्छा मात्र धरावी.
 परंतु सांप्रत काळी लोक अगदी उलटे करीत आहेत. लाच खातात, लबाड्या करतात, विद्यावृद्धीस मदत करीत नाहीत; सर्व सरकारने करावे, असे इच्छितात. व जर सरकार चांगले करीत असेल तर वाईट समजतात, व सरकारास लोक सुधारण्याचे कामात अगदी मदत करीत नाहीत. सरकारने आज जर असे म्हटले की, अनुष्ठानाचा व अमुक देवस्थानाचा खर्च व्यर्थ होत आहे. तो मोडून अमुक विद्यावृद्धीचे काम करितो, तर लोकांस पसंत होणार नाही. दक्षणा पहिली मूर्ख रीतीने देत होते, तिचा काहीच उपयोग नव्हता. तेच रुपये जर नीट खर्च केले, तर बहुत उपयोग होऊन लोक शहाणे होतील; परंतु असे जर केले, तर लोक खुषी नाहीत.
 लोकांस असे वाटते की, पहिला मूर्खपणा कायम ठेवावा; आळशीपणाचे स्वभाव कायम ठेवावे. म्हणजे ते सरकार चांगले, परंतु लोकांनी या दुर्बुद्धी सोडून देऊन सरकारास हरएक कामात मदत करावी, हे योग्य. म्हणजे सरकारास आनंद होतो आणि त्याचे हातून सुधारणा पुरतेपणी होते. हल्ली फार तर काय परंतु जेथे म्हणून सरकारी शाळा आहेत, तेथे लोकांच्या कमिट्या आहेत, परंतु त्या पंचांस पुसले तर कदी त्यांनी शाळा पाहिली नाही, असे सांगतील व शाळा आहे किंवा नाही, याविषयी संशयात्मक बोलतील. जे सुपरिटेंडेंट येतात, त्यांस पंचांस शोधावे लागते व बळेच परीक्षेचे दिवशी उभे करतात, ते मनापासून मेहनत करीत नाहीत.
 कोणी जर सरकारी कामदार असला, तर त्यांस सरकारी काम विशेष