पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३९३

पृष्ठ २०४: मुंबईत... धर्म बुडाला...
 या संदर्भात 'प्रभाकर' पत्रातील पुढील पत्र पाहण्याजोगे आहे. पत्रलेखक 'हिंदुधर्माभिमानी' आपल्या १६-१-११५२ च्या पत्रात लिहितो- "..आश्चर्याची व दुःखाची गोष्ट म्हणजे येथे (मुंबईत) येताच तेथील हिंदूंची मने बहकून गेली आहेत असे मला आढळून आले! काही लोक म्हणतात पुनर्विवाह करा, कित्येकांस आपल्या मुलीबाळी शाळेत पाठवाव्या असे वाटू लागले आहे! आणि कित्येक तर जातिबंधने तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत!.. वजनदार... गृहस्थही अशा कार्यास हातभार लावीत आहेत!... जगन्नाथ शंकरशेट यांची स्वधर्मावरील श्रद्धा सर्वप्रसिद्ध आहे. परंतु त्यांचे दाखवावयाचे दात वेगळे व खावयाचे दात वेगळे आहेत." (नाना शंकरशेट यांचे चरित्र- पु. बा. कुलकर्णी; पृ. ११० वरून)
 मुंबईमधील सुधारणांकडे सनातनी लोक कोणत्या दृष्टीने पहात होते याची कल्पना या पत्रावरून येईल व लोकहितवादींचे उद्गार किती अर्थपूर्ण आहेत हे लक्षात येईल.

३. आमचे वर्णगुरू

पृष्ठ २१५: ब्राह्मण... लोक यांणी दीडशें वर्षे राज्य केले; परंतु असे काही (शोधन वगैरे) केले नाही
 एका प्रसंगी नदीचे पाणी हटविण्यासाठी नाना फडणविसाने इंग्रजांकडून 'कळ' (यंत्र) आणविली. 'कळी'शिवाय पाणी हटणार नाही हे नानास कळले; पण 'कळ' आपणच निर्माण करावी हे त्याच्या मनात आले नाही किंवा आले असले तरी त्यातून काही निष्पन्न झाले नाही. याचे कारण शोधप्रवृत्तीच त्या काळात नष्ट झाली होती. यामुळे साध्यासुध्या वस्तूंसाठी सुद्धा लोकांना परकीयांकडे पहावे लागत असे. या संदर्भात, न. चिं. केळकर यांनी 'मराठे व इंग्रज' या ग्रंथात जे लिहिले आहे (समग्र केळकर वाङ्मय, खंड ७, पृ. ३०४) ते लक्षात येण्याजोगे आहे- "पल्लेदार तोफा, बंदुका, पाणीदार तलवारी व कट्यारी, होकायंत्रे, दुर्बिणी वगैरे युद्धोपयोगी पदार्थ, तसेच घड्याळे, हंड्या झुंबरे, आरसे, उत्तम रेशमी कपडा, तलम बारीक मलमल वगैरे व्यवहारोपयोगी पदार्थ याकरिताही त्यांना (मराठ्यांना) इंग्रज, चिनी, मुसलमान वगैरे लोकांच्या तोंडाकडे पहावे लागे... या जिनसा उत्पन्न करण्याची इच्छा त्यांना फारशी झाली नाही." ही इच्छा का झाली नाही याची मार्मिक मीमांसा