पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४० : शतपत्रे

एका पत्रात लोकहितवादींनी राज्यसुधारणा, किंवा रिवोल्यूशन किंवा क्रांती याविषयी आपले विचार मांडले आहेत. त्या वेळी फ्रान्समध्ये १८४८ ची क्रांती झाली होती. तिच्या बातम्या इकडे आल्या होत्या. त्या अनुरोधाने हे पत्र (पत्र क्र. १४ - राज्यसुधारणा) त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या मते दंगा, बंड म्हणजे रिवोल्यूशन किंवा राज्यसुधारणा नव्हे. राज्यात बंदोबस्त कमी असला म्हणजे ठगपेंढाऱ्यांसारखे लोक जमा होतात व गरीब रयतेस लुटण्याकरता जागोजाग हल्ले करतात. त्यांचे नाव बंड. तोतया, चतुरसिंग, राघुभराऱ्या, पेंढारी यांनी दंगे केले त्यास बंडे म्हणावे, परंतु राज्यसुधारणा हे या रीतीचे बंड नव्हे. ज्या देशात लोक शहाणे व ज्ञानी व एकमेकांचे सहोदर बंधूंप्रमाणे हित पाहणारे असे आहेत, त्या देशात मात्र अशी राज्यसुधारणा होते. हिंदुस्थानसारख्या देशात ती व्हावयाची नाही. सांप्रत टोपकर लोक शहाणे आहेत व त्यांच्यामध्ये कित्येक चांगल्या व हितावह गोष्टी आहेत. त्या आपले लोकास अद्याप माहीत नाहीत. इंग्लंडात जॉन राजाकडून अन्याय झाले. तेव्हा सर्व रयतेने उठून त्याजकडून करार करून घेतला. तो करार म्हणजे तिकडील सर्व कायद्यांचे मूळ असून तो हल्लीपर्यंत चालू आहे. पुढे चार्लस राजाने पुनरपि अन्याय केले. तेव्हा लोकांनी न्यायसभा भरवून त्याचा गुन्हा शाबीत केला व त्यास शिरच्छेदाची सजा दिली. अशा गोष्टी तिकडे घडतात. त्या इकडे अनश्रुत आहेत.
 लोकहितवादींच्या मते हिंदुस्थानच्या इतिहासात अशी राज्यसुधारणा- जिला रिवोल्यूशन म्हणता येईल अशी- पूर्वी कधी झाली नाही. मात्र अपवाद त्यांनी केला आहे. तो म्हणजे शिवाजीराजाचा. मराठ्यांचे व सर्व हिंदू लोकांचे राज्यासंबंधी माहात्म्य सरकारी पाचशे वर्षेपर्यंत मुसलमानांनी बळकाविले होते ते पुनरपि हिंदू लोकांचे हिंदू लोकांकडे शिवाजीचे कृत्यामुळे आले, तस्मात ती राज्यसुधारणा होय. शिवाजीचे मागे तसा सद्बुद्धिमान पुरुष झाला नाही. त्यामुळे ते कार्य तसेच राहिले. पण शिवाजी राज्यसुधारक म्हणावयास योग्य आहे, यात शंका नाही.
 पण ही गोष्ट लोकहितवादींच्या मते अपवादात्मक होय. एकंदरीत पाहता हिंदू लोकांना राज्यसुधारणेचे सामर्थ्य नाही. यासाठी ईश्वराने इंग्रजांची योजना केली आहे. असे त्यांचे मत होते.

६. आर्थिक विचारसरणी

 १. बंगाली पंडित व लोकहितवादी :- अगदी प्रारंभी म्हटले आहे