पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ४३

 ३. व्यापार बुडाला :- 'स्वदेशी बहिष्कारा 'विषयीचा हाच विचार 'हिंदू लोकांचा व्यापार' या पत्रात त्यांनी जास्त स्पष्टपणे मांडला आहे. 'सांप्रत हिंदू लोक फार भिकारी होत चालले आहेत, व त्यांस रोजगार धंदा नाही. याचे कारण मला असे दिसते की, या लोकांचा व्यापार अगदी बुडला. इंग्रज व दुसऱ्या देशाचे लोक फार शहाणे होऊन या लोकांस सर्व जिनसा पुरवितात. आणि हे मुकाटयाने स्वस्ताईमुळे खरेदी करतात. म्हणून आपले लोकांनी कट करावा की, दुसरे मुलखाचा जिन्नस घ्यावयाचा नाही. आपले देशात पिकेल तेवढाच माल घ्यावा. आपले लोक कापडे जाडी करतात, परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करतात त्याच घ्याव्या म्हणजे या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल. परंतु हे लोक असे करीत नाहीत. आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात. अजून दाणे (धान्य) परदेशातील येऊ लागले नाहीत. बाकी सर्व पाहावे ते परदेशाचे आहे. आमचे कपडे, आमची छत्री, आमची चाकू-कात्री, आमचे घड्याळ, आमची गाडी, आमची बुके, सर्व परदेशातील आहेत. यामुळे व्यापार बुडाला. उदमी, मजूर, कसबी, कारागीर घरी बसले. याजकरिता सर्वांनी कट करावा की, जे आपल्या देशात पिकेल तेच नेसू, तेच वापरू. ते कसेही असो आणि तितक्याच चांगल्या विद्या व जिन्नस उत्कृष्ट करावयाच्या विद्या शिकू. कापूस विणकरांनी असा बेत करावा की इंग्रजास इकडे तयार केलेली कापडे द्यावी, परंतु कापूस देऊ नये. मग हजारो खंडी कापूस (कच्चा माल) इकडून विलायतेस कशास जाईल ? असे झाले म्हणजे हे लोक सुखी होतील. सध्या परदेशाच्या भुलावणीने हाहाःकार झाला आहे. जो तो शेत करू लागला. दुसरा व्यापार नाही. पैसा दुसऱ्या देशात चालला. लाखोपती आहेत ते विलायती जिनसा घेतात. ते धान्य घेतात त्याची किंमत फक्त येथल्या रयतेकडे जाते. बाकी हजारो रुपये थेट विलायतेस जातात. याप्रमाणे हमेशा चालले आहे. तेव्हा कसा कट करणे वगैरे उपयोगी गोष्टी आहेत त्या पुराणिक, हरदास यांनी लोकांस सांगाव्या, त्या टाकून दुसऱ्या गोष्टी सांगतात आणि यांजकडे लक्ष देत नाहीत.' (पत्र क्र. ५७).
 ४. द्रव्याचा योग्य उपयोग :- व्यापार, कारखानदारी, स्वदेशी, बहिष्कार यांचे विवरण लोकहितवादींनी केले आहेच. पण याही पलीकडे जाऊन, अगदी मूलगामी चिंतन करून हिंदू लोकांच्या मनःप्रवृत्तीच याला कशाविरोधी आहेत त्याचेही विवेचन ते करतात. ते म्हणतात, 'मागील पत्रात विद्येचा उपयोग या देशात विद्वान लोक करीत नाहीत म्हणून लिहिले. आता एक गोष्ट आम्हास सुचली आहे की, द्रव्यवान लोक द्रव्याचाही उपयोग करीत नाहीत. द्रव्य कोणत्या