पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४६ : शतपत्रे

दुर्भाग्याचा होय. त्या शास्त्राने भारताच्या वैभवाचा नाश केला आहे. इसवीसनाच्या आठव्या नवव्या शतकापर्यंत हिंदु लोक धर्मप्रसारासाठी, साम्राज्यासाठी व व्यापारासाठी त्रिखंडात संचार करीत होते आणि या तीनही क्षेत्रांतले आपले वैभव त्यांनी अगदी कळसाला नेले होते. (संस्कृती-संगम, द. के. केळकर, प्रकरण ७ वे व ९ वे पाहा.) असे असून पुढे जातिभेदाची बंधने कडक झाल्यामुळे परदेशगमन करील त्याला लोक वाळीत टाकू लागले, तो जातिबहिष्कृत होऊ लागला आणि धर्माच्या या विपरीत व अमंगळ कल्पनेमुळे आपला विश्वसंचार थांबला व त्याबरोबरच धर्मप्रसार, साम्राज्यविस्तार व व्यापारही थांबला. हे सर्व सोवळ्यामुळे झाले, यालाच उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे की, 'आम्ही मुकट्यासाठी मुकुट घालविले.' हाच विचार लोकहितवादींनी वरील पत्रांतून मांडला आहे.
 हिंदूंनी परदेशगमन केले, युरोपातील अर्थव्यवस्था पाहिली तर द्रव्याचा उपयोग भांडवलासाठी करावा हे त्यांना कळेल. त्यांना प्रयत्नवादाचे महत्त्व समजून येईल आणि मग ते व्यापार, कारखानदारी या क्षेत्रात लक्ष घालू लागतील. असे झाले तरच हिंदुस्थानचे दारिद्र्य नष्ट होईल असा लोकहितवादींच्या आर्थिक विचारसरणीचा सारार्थ आहे.

७. मूल्यमापन

 लोकहितवादींच्या विचारधनाचे स्वरूप येथवर आपण पाहिले. धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, इंग्रजीविद्या, संस्कृतविद्या, परदेशगमन इत्यादी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र चिंतन करून आपले मूलगामी विचार शतपत्रांतून मांडले आहेत. 'शतपत्रे' हे त्यांचे अगदी आरंभीचे लेखन. त्या वेळी त्यांचे वय केवळ २५ वर्षांचे होते. एवढ्या वयात समाजजीवनाच्या सर्व अंगोपांगाचे एवढे आकलन व्हावे, पाश्चात्त्य व पौर्वात्य संस्कृतीतील भेद इतक्या स्पष्टपणे कळावा आणि त्यावर उपाययोजना काय करावी हेही स्पष्टपणे ध्यानात यावे इतकी भेदक प्रज्ञा लोकहितवादींना लाभली होती. त्यांचे लेखन वाचीत असताना त्यांचे वय लक्षात येऊन पदोपदी वाचकाला विस्मय वाटत असतो.
 १. शतपत्रांनंतरचं लेखन :- पुढल्या काळातही लोकहितवादींनी आपले समाजाच्या मार्गदर्शनाचे कार्य अखंड चालू ठेवले होते. १८७६ साली त्यांनी 'हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे' हे पुस्तक प्रसिद्ध केले. दादाभाई