पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ४७

नौरोजी यांच्या 'पाव्हर्टी इन इंडिया' या निबंधाच्या आधारे त्यांनी 'इंदुप्रकाश' या पत्रात आठ लेख लिहिले. तेच या पुस्तकात एकत्र छापलेले आहेत. लॉर्ड रिपन यांनी हिंदुस्थानात स्थानिक स्वराज्याची स्थापना केल्यानंतर याविषयी लोकांना माहितगारी करून देण्यासाठी 'स्थानिक राज्यव्यवस्था' हा एक छोटासा प्रबंध लोकहितवादींनी १८८३ साली लिहिला. त्यात त्यांनी शासनसंस्थेच्या स्वरूपाचे दिग्दर्शन करून प्रजेच्या मूलभूत हक्कांचे विवेचन केले आहे. १८८३ साली त्यांनी 'ग्रामरचना, त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती' या विषयावर एक निबंध लिहिला. 'प्रभाकर' या पत्रात त्यांनी शतपत्रे लिहिली. त्याचप्रमाणे 'वृत्तवैभवा'त अनेक निबंध लिहिले. या सर्व लेखांचा एक संग्रह 'निबंध संग्रह' या नावाने त्यांनी १८६६ साली प्रसिद्ध केला. हा सुमारे १,१०० पृष्ठांचा ग्रंथ आहे. या ग्रंथावरून आपल्या समाजाच्या भवितव्याची लोकहितवादी कशी अखंड चिंता करीत असत ते ध्यानी येते. इतिहास हा तर लोकहितवादींचा अत्यंत आवडीचा विषय होता. भारतीयांची प्राचीन काळापासूनची या महत्त्वाच्या विषयासंबंधीची अनास्था पाहून त्यांना फार खेद वाटे. १८५१ सालीच त्यांनी 'भरतखंड पर्व' या नावाने हिंदुस्थानचा एक संक्षिप्त इतिहास लिहून इतिहासलेखनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली. आणि त्यानंतर सुराष्ट्र, गुजराथ, राजस्थान, लंका या देशांच्या इतिहासांची मराठीत भाषांतरे केली. हे सर्व ग्रंथ पाहता 'आमच्या देशाच्या माहितीच्या संबंधाने लोकहितवादी हे केवळ समुद्र आहेत ही त्यांच्याविषयीची उक्ती सार्थ आहे असेच कोणाचेही मत होईल.'
 २. टीकांचा परामर्श :- लोकहितवादींचे बुद्धिवैभव; त्यांचा व्यासंग, त्यांची स्वदेशहिताविषयीची कळकळ, वार्धक्यातही त्यांच्या ठायी तरुणांना लाजवील असा दिसणारा उत्साह या सर्व गोष्टी आज वादातीत आहेत. असे असताना त्यांच्यावर त्या काळी अनेक पंडितांनी फार कडक टीका केली, यांचे कारण काय याचा विचार केला पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेत लेखावर लेख लिहून लोकहितवादींवर फार भयंकर टीका केली आणि लोकांच्या डोळ्यांपुढे प्रामुख्याने तीच टीका आहे, पण त्यांच्यावर फक्त शास्त्रीबुवांनीच अशी टीका केली असे नव्हे. 'इंदुप्रकाश', 'नेटिव्ह ओपिनियन', 'विविध ज्ञानविस्तार' अशांसारख्या इतरही अत्यंत जबाबदार व भारदस्त पत्रांनी त्यांच्यावर इतकीच, क्वचित जास्तच कडक टीका केलेली आहे. म्हणून या टीकांचा थोडा परामर्श घेणे अवश्य आहे.
 ३. उपदेश व कृती यांतील विसंगती :- लोकहितवादींवर टीका