पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५० : शतपत्रे

वचनभंग, पिसाट लोभ यांनी ती चरित्रे बरबटलेली आहेत हे लोकहितवादींना माहीत नव्हते काय ? आणि माहीत असूनही त्यांनी जर इंग्रजांची अनन्वित स्तुती केली असेल व त्यांना 'ईश्वरी योजनेत' बसविले असेल तर त्याचा अर्थ काय करावयाचा ?
 ६. शिवराळ भाषा :- लोकहितवादींची शतपत्रांतील भाषा हीही लोकांना चीड येण्यास कारणीभूत झाली. मूर्ख, टोणपे, बैल, जनावरे, पोळ अशा शिव्या त्यांनी ब्राह्मणांना व एकंदर हिंदू समाजाला प्रत्येक पत्रात दिल्या आहेत. काही ठिकाणी तर ग्राम्य शिव्याही दिल्या आहेत. भाषेतला हा प्रखरपणा, हे धैर्य त्यांनी प्रत्यक्ष कृतीत दाखविले असते तर लोकांनी ही भाषा खपवून घेतली असती. कधी कधी तिचे कौतुकही केले असते. पण कृतीची वेळ येताच प्रत्येक आघाडीवर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे या प्रखर भाषेने लोकांना चेतना मिळण्याऐवजी त्यांचा तेजोभंग मात्र झाला. आणि आधीच पराभूत झालेल्या समाजाचा तेजोभंग करणे हे फार मोठे पाप होय. विष्णुशास्त्री यांनी त्यांच्यावर भयंकर भडिमार केला तो या कारणासाठी.
 ७. दूषण वगळूनी :- पण आज शंभर वर्षांनी मूल्यमापन करताना आपण हे सर्व दोष दृष्टीआड केले पाहिजेत. 'दूषण वगळुनि भूषण घेऊनि प्रभुपूजन करि काळ असे' असे गोविंदाग्रजांनी म्हटले आहे, तेच खरे आहे आणि अशा वृत्तीने आपण लोकहितवादींच्या कार्याकडे पाहू लागलो, त्यांचे लेख वाचू लागलो, की आपण त्यांचे शतशः ऋणी आहोत आणि अनेक पिढ्या असेच ऋणी राहू याविषयी दुमत होणार नाही. समाजाचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक क्षेत्रातले दोष आकळून नव्या युगाचे मार्गदर्शन करणे हे सामान्य प्रतिभेचे काम नाही. लोकहितवादींनी चाळीस वर्षे हे कार्य सतत चालविले आणि त्यामुळेच महाराष्ट्र समाजात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे पुढील नेत्यांचे काम जास्त सुकर झाले, यात शंका नाही.
 वर त्यांच्या इतर ग्रंथांचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी सांगितलेले विचार पाहिले म्हणजे तर आपल्या मनात याविषयी कसलीच शंका राहणार नाही. त्यांच्याविषयी समकालीन लोक साशंक होणे साहजिक आहे असे वर म्हटले आहे, पण नंतरचे त्यांचे निबंध-प्रबंध आपण वाचले म्हणजे मग तसल्या शंकांना आपल्या मनात मुळीच थारा मिळणार नाही.
 ८. इंग्रज लुटारू :- 'हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे' या आपल्या पुस्तकात ज्या ब्रिटिश राज्यपद्धतींचे त्यांनी शतपत्रात गोडवे गाईले आहेत