पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५६ : शतपत्रे

अवस्थेत होते, रूम देशात त्यांना गुलाम म्हणून फुकट घेण्यासही कोणी तयार नसत, अशी स्थिती असताना आज ज्ञानाच्या व उद्योगाच्या बलावर ते एवढया उन्नत दशेस येऊन पोचले, हे सांगताना त्या देशाच्या इतिहासाचा समग्र चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोर उभा असलाच पाहिजे. आपल्याकडील प्राचीन इतिहासाचा आढावाही ते असाच सहज दोन-चार वाक्यांत घेतात. पांडवांच्या काळी हा देश ऐश्वर्यसंपन्न होता असे त्यांचे मत होते. त्यानंतर विद्येची अभिरुची लोपत चालली व सर्व अंधार झाला, हे सांगताना हे कसकसे घडत आले याचे त्यांनी जे वर्णन केले आहे ते त्यांच्या या विषयाच्या अभ्यासाची साक्ष देईल. अर्थशास्त्राविषयीचा त्यांचा अभ्यास तर फारच सूक्ष्म होता. त्यांच्या आधीच्या बंगाली पंडितांनाही ब्रिटिश भांडवलशाहीचे जे भयाण रक्तशोषक रूप कळले नव्हते ते यांनी बरोबर आकळले होते आणि स्वदेशी व बहिष्कार हाच त्यावर उपाय आहे हेही बरोबर जाणले होते. युरोपीय देशांतील गेल्या शतकातील आर्थिक घडामोडींचे सूक्ष्म ज्ञान आल्यावाचून असे अचूक निष्कर्ष काढणे कोणालाच शक्य झाले नसते. संस्कृत विद्येची त्यांनी फारच हेटाळणी केली आहे. पण ती उत्तर काळच्या संस्कृत विद्येची. प्राचीन काळची संस्कृत विद्या कशी जिवंत होती, ज्योतिष, वैद्यक, गणित, धर्म, इत्यादी शास्त्रांत त्यावेळी मौलिक संशोधन कसे चालत असे त्याचे यथायोग्य मूल्यमापन लोकहितवादींनी केलेले आहे. त्यावरून त्या विद्येच्या अभ्यासाची त्यांनी हेळसांड मुळीच केली नव्हती, हे स्पष्ट दिसून येते.
 ४. मतपरिवर्तनाचा मार्ग :- लोकहितवादींची मते अत्यंत क्रांतिकारक अशी होती. प्रत्येक क्षेत्रात रूढ मतात व त्यांच्या मतात दोन ध्रुवांइतके अंतर होते, तरी लोकांची सुधारणा करावयाची ती लोकांच्या मनाची खात्री करून देऊन, त्यांचे मतपरिवर्तन घडवून करावयाची, हेच धोरण, यांना मान्य होते, आणि तेच त्यांनी अवलंबिले होते, हे शतपत्रांतील पानापानांवर दिसून येते. ते म्हणतात, 'केवळ जबरदस्तीने लोकांकडून पूर्वीपासून चालत आलेली चाल मोडवून नवी रीत काढणे हे योग्य नाही. अशा गोष्टी लोकांच्या समजुतीने मोडाव्या हे बरे. कोणी म्हणतील की, हिंदू लोक इतके शहाणे नाहीत. तरी काय चिंता आहे ? आजचे उद्या होईल, पण आणखी आणखी सरकारचे हातात जाणे (कायद्याने सरकारी साह्याने सुधारणा घडविणे) हे त्या उशिरापेक्षा वाईट व जे जबरीने चालू झाले त्याचा खचितपणा नाही. ज्या काळी जबरी एकीकडे होईल तेव्हा लोक पुन्हा पूर्वीप्रमाणेच करू लागतील. तेव्हा उत्तम मार्ग हाच की ही गोष्ट लोकांच्या मनात अनेक तऱ्हेने भरवून द्यावी. स्वसंतोषाने लोक समजू लागले म्हणजे पहिली चाल