पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ६३




शतपत्रांचा इत्यर्थ

पत्र नंबर : १००

 मी आपले श्रम या पत्रांत संपूर्ण करणार. यास्तव या लिखित पत्रशतकाविषयी काही सुचवतो.
 आज दोन वर्षे मी लोकांस त्यांची स्थिती, रीती कशी आहे ती अगदी भीड न धरितां उघड करून सुचविली. त्यात एखादे अक्षर अधिकउणे, शुद्ध-अशुद्ध, कोणास वाटले तर त्यांनी क्षमा करावी. माझे जिवाची पक्की खात्री आहे की, जो कोणी पत्रांचे अवलोकन करील आणि विचार करून पाहील, त्यास प्रत्येक शब्द खरा आहे असे वाटेल. लोकहितवादीने कोणाची मजुरी पत्करली नाही, कशाची अपेक्षा; आशा किंवा इच्छा धरली नाही. कोणाचे सांगण्यावरून किंवा शिकविल्यावरून कृत्रिम वर्णन केले नाही. लाभावर किंवा द्रव्यावर नजर ठेवून कीर्ती व्हावी या हेतूने लिहिले नाही. इतके श्रम जे केले ते लोकांस त्यांची वास्तविक स्थिती कशी आहे ती कळावी. त्यांनी सुधारावे, त्यास इहलोकी सुखवृद्धी व्हावी. परलोकाचे साधन घडावे, व आपले बहुत काळापासून दृढ ग्रह झाले आहेत यांपैकी काही अविचाराने व काही मूर्खपणाने जडलेले आहेत ते कमी व्हावे; किंवा नाहीसे व्हावे, इतक्याच हेतूने मी यथामतीने व स्वइच्छेने वेतनावाचून श्रम केले आहेत व जितके लिहिले आहे तितके अक्षरशः खरे खरे निवडून विचार करून काळजीने लिहिले आहे. हे सर्व लोकांस नजर आहे.
 हे लिखित शतक कोणी बाळबोध अथवा मोडी छापून मुलास लिखितासारखे वाचनास दिले तर बहुत नफा होईल. यास्तव या ग्रंथावर लोकहितवादी आपली सत्ता ठेवीत नाही. पाहिजे त्यांनी ही पत्रे छापून प्रगट करावी. किती एक प्राचीन काळचे लोकांस किती एक लोकहितवादीची मते विपरीत व हिंदुधर्मास विरुद्ध भासतील, परंतु हा त्यांचा मिथ्या भास आहे;