पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४ : शतपत्रे

कारण की, त्यात हिंदुधर्मास काही विपरीत नाही. फक्त मूर्खपणास मात्र विपरीत आहे. याविषयी विचार केला तर खात्री होईल. यापुढे काही दिवसांनी लोकहितवादी दुसऱ्या शतकास आरंभ करील; परंतु ही गोष्ट ईश्वराचे स्वाधीन आहे. मला वारंवार इतकेच लोकांस सुचवावयाचे की, मी काही व्यर्थ, मिथ्या किंवा असत्य, लिहिले नाही. जे लिहिले ते यथार्थ आहे, असे मला तर खचित वाटते. जे सारासार विचार करणारे, व ज्यांची मने पंडितांसारखी कुत्सित नसून विस्तीर्ण झाली आहेत त्यांस हे समजेल.
 माझी सर्व जनांस एवढीच विनंती आहे की, तुम्ही सर्व जण विचार करण्यास लागा, वाचावयास लागा, नवीन ग्रंथ व वर्तमानपत्रे वाचा व तुमचे शेजारी काय होत आहे याचा विचार करा. इंग्रजांमध्ये किती एक चांगले गुण आहेत व ते तुम्हांस प्राप्त व्हावे म्हणून ईश्वराने त्यांची तुमची संगत घातली आहे हे लक्षात आणा. सारासार पहा, परंपरा आंधळ्याची माळ लावली म्हणून तीच चालवू नका, धर्मशील ईश्वरतत्पर व्हा. या गुणांवाचून सर्व व्यर्थ आहे. सत्य बोला, दुष्ट वासना सोडा, धर्मसुधारणा करा, म्हणजे धर्म टाकू नका. परंतु त्याचा अर्थ घ्यावयाचा तसा काळ पाहून घ्या. व ईश्वरासंबंधी व जगासंबंधी ज्ञान सर्व लोकांस वृद्धिंगत करा. आळस सोडा, तुमच्यामध्ये वास्तविक बुद्धिमान असेल त्यांस पुढारी करा. त्याचे अनुमताने चाला. सर्व लोकांची जूट असू द्या, आपसांत फूट नसावी हे ध्यानात वागवा. विद्या अधिक होऊन तुमचे पाऊल पुढे पडू द्या. सर्व देशाची काळजी प्रत्येक जणाने करावी. राज्य कसे चालले आहे व राजा कोण, त्याची वर्तणूक कशी हे पाहत जा. माहीतगार व्हा.
 तुमच्या प्राचीन काळच्या विद्या, ग्रंथ, तर्क व कल्पना यांचे शंभरपट आता चांगल्या विद्या व अधिक कल्पना निघालेल्या आहेत, त्या सर्व पहा. तुमचे संपत्तीवर तुम्ही लक्ष देऊन आळसात राहू नका. भट व पंडित हे केवळ मूर्ख हे पक्के समजा. खरी नीती कोणती ते पहा. पैसा खाऊ नका, रांडबाजी करू नका. प्रपंच, संसार भलाईने करा, आपले शत्रूसदेखील वाईट इच्छू नका, शरीराने व मनानेदेखील पाप करू नका. प्राणिमात्रावर दया करा, अपराध क्षमा होतील तितके करा, परंतु क्षमा न करण्याचा प्रसंग येईल तेथे क्षमा करू नका, एकमेकांवर प्रीती करा, नित्य उठून ईश्वराचे भजन व प्रातः काळी चिंतन करीत जा, त्याजवळ क्षमा मागा, आपले हातून पापे व अपराध बहुत घडतात. त्यांची क्षमा भगवंताशिवाय करणार समर्थ कोणी नाही. ढोंग, सोंग करू नका, लबाडी सर्वदा ईश्वरास दिसती, यास्तव कदापि करू नका. कोणचेही पाप