पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ : शतपत्रे

पुण्यात लायब्ररीची स्थापना

पत्र नंबर ३ : २६ मार्च १८४८

 पुणे येथील पुस्तकगृहाविषयी वर्तमान आपल्यास लिहितो.
 पुण्यासारखे शहरात विद्याशाळा वगैरे बऱ्याच आहेत. परंतु ग्रंथ वाचण्याची जागा अद्याप लोकांस माहीत नव्हती व तिचा उपयोग कोणा नेटीव लोकांस माहीत नव्हता; परंतु सांप्रतचे गवरनरसाहेब सर जार्ज क्लार्क यांनी लोकांचे सुधारणेकडे लक्ष देऊन जड्ज साहेब हेनरी ब्रौन यास सुचविले की, पुण्यात लायब्ररी स्थापण्याचा बेत करावा. त्याजवरून त्यांनी तारीख २८ जानेवारी, साल मजकुरी सर्व लोकांची सभा जमवून त्यास हा मजकूर निवेदन केला. तेव्हा बुधवारचे वाड्यातील इंग्रजी शाळेतील अभ्यासी लोकही पुष्कळ हजर होते, त्या सर्वांनी अनुमोदन दिले व अदालतीकडील चाकरमंडळी व सरदार लोक यांनीही बरे आहे, असे म्हटले. पुण्यातील किती एक आळशी लोकांनी उदारपणाने पैसा दिला नाही. तथापि अजमासे दीड हजार रुपये जमले आहेत.
 सभेपैकी दहा असामी कमिटीत नेमून लायब्ररीचे कायदे ठरविल्यानंतर पुनरपि तारीख ४ थी फेब्रुवारीस दुसरी सभा भरली. त्यावेळेस कमिटीपैकी एके गृहस्थाने विद्येचे उपयोगाविषयी महाराष्ट्रभाषेत एक निबंध केला होता तो वाचून दाखविला. पुण्यातील बहुत गृहस्थांस सांप्रत काळी विद्या आणि ज्ञान काय आहे, याविषयी समजूत नाही व ते आज बहुत वर्षे स्वस्थ घरी बसून इंग्रज सरकारची देणगी खात आहेत. याजमुळे अशा कामात ते झटून पडत नाहीत व त्यांस कितीही समजून सांगितले, तरी त्यांच्या ज्या जुन्या व पोकळ समजुती आहेत, त्याच ते खऱ्या धरतात व त्या बदलण्यास बहुत दिवस पाहिजेत. याच कारणाने दुसरे सभेत आणखी जास्त पैसा जमला नाही; परंतु असे ठरविले की, लायब्ररीचे काम पाहण्यास एक धाकटी कमिटी असावी व तिची नावे त्याच वेळेस लिहिली आणि लायब्ररीयन एक असामी नेमून बुधवारचे वाड्यात कलेक्टरसाहेब यांनी कृपा करून जागा दिली आहे, त्या ठिकाणी तारीख ७ फेब्रुवारीपासून लायब्ररी सुरू झाली.
 अद्याप गृहस्थांपैकी कोणी ग्रंथ वाचावयास व ज्ञान संपादन करावयास येत नाहीत. शाळेतील विद्वान मंडळी, ज्ञानेच्छू व विद्याभ्यासी मात्र येतात. सरदार लोक येत नाहीत. त्याविषयी मला असे वाटते की, आम्ही थोर, चार