पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ६७

शिपाई, घोडे, अबदागरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर कधी पडत नाही. तेव्हा या लायब्ररीत मुलांसारखे शिकण्यास जावयाची त्यांस लज्जा वाटत असेल; परंतु अज्ञानामुळे आणि अनश्रुतपणामुळे त्यांची अशी अवस्था जहाली. तथापि तिचा परिहारोपाय ते ग्रहण करीत नाहीत, हे आश्चर्य आहे. ज्यांस अन्नवस्त्र मिळते, ते म्हणतात की, आम्हास विद्येची काय गरज आहे व ज्यांस मिळत नाही ते पोटापाठीमागे लागतात. तात्पर्य, अक्कल वाढविण्याचे काम कोणाच्याने होत नाही. असो. या अडचणी काही दिवसांनी दूर होतील व ज्ञानाचे संपादन नेटीव लोकांत चालू होईल.
 सांप्रत काळी तर आपले शास्त्रात व देशात काय आहे व इंग्रज लोक हे कोठून येऊन राज्य करतात व याची व्यवस्था काय आहे, हे कोणास माहीत आहे का ? म्हणून विचारले, तर नाही म्हणून बहुतेक शपथ करतील; तेव्हा कोणाचे अमलात आपण आहो, हे ज्यांस कळत नाही; त्यांचे अज्ञान काय वर्णावे ? परंतु हे दूर होण्याचे साधन गवरनरसाहेबांनी लायब्ररी चालू केली, याबद्दल त्यांची कीर्ती बहुत काळपर्यंत राहील आणि आज नेटीव लोक तिचा लाभ समजत नाहीत, तरी पुढे कधी काळी समजून स्तुती करतील व पुणे येथे मेहरबान ब्रौनसाहेब जड्ज होते, त्यांनी या कामास फार आश्रय दिला, त्यांचे योगाने हे काम सिद्धीस गेले; असे लोक आठवतील, अशी आशा आहे.
 गवरनरसाहेब यांनी हिंदू लोकांचे अज्ञान दूर होण्याचा उपाय पुण्यात केला असे नाही; परंतु नगरासही केला आहे. व इतर ठिकाणी जागोजागचे रेसिडेंट वगैरे अधिकारी यास तसेच करण्याविषयी हुकूम पाठविले आहेत. गवरनरसाहेबांचे प्राइव्हेट सेक्रेटरी कप्तान फ्रेंच यांनी ही प्रवृत्ती चालू करविली, याबद्दल त्यांचेही मोठे उपकार समजले पाहिजेत; परंतु मला फार दुःख वाटते की, आपले लोक ज्ञान संपादन करणे, हे लहान मुलांचे काम असे समजतात, आणि शिकत नाहीत. आता जे असे म्हणणारे आहेत, ते काही जाणतात, असे असते, तर मी क्षमा केली असती; परंतु ते केवळ अडणीवरचे किंवा सांबापुढचे असून, विद्येस असे तुच्छ मानितात व थोडे खावयास मिळू लागले, म्हणजे आपली अप्रतिष्ठा होईल, असे समजून वाचणे व अभ्यास करणे सोडून देतात, याबद्दल वाईट वाटून त्यांचा फार राग येतो. दुसरे, ज्याच्याजवळ द्रव्य आहे, ते मदांध; त्यांस असे वाटते की, आम्हासारखे कोणीच नाहीत. विद्या काय आहे ? विद्येचे सार जे द्रव्य ते आम्हाजवळ आहे, असे त्यांस वाटते व ते आपल्यास सूर्यचंद्राइतके उंच समजतात. ही खोडी नेटीव लोक लवकर