पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८ : शतपत्रे

टाकतील, तर बरे आहे; पूर्वी यांची हीच खोडी होती; परंतु ती बाहेर व्यंगोर्मीसारखी दिसत नव्हती. कारण पुण्यात पेशव्यांचे राज्य होते व त्यामुळे किती एक प्रतिष्ठेने पैका मिळवीत होते, म्हणून त्यांचे ज्ञान व अज्ञान आजपर्यंत दिसले नाही.
 परंतु आता तो समय नाही. आता बाहेर काय आहे, हे समजून आपली नीट अवस्था कशाने होईल, हे पाहण्याची वेळ आहे. म्हणून नेटीव लोक आळस व गर्व न करतील, तर फार चांगले होईल. अस्तु. हल्ली लायब्ररीत ३०० बुके आहेत व अखबारा चार आहेत. बरेच चालले आहे व पुढे सुधारेल, अशी आशा आहे.

♦ ♦


छापण्याची कला आणि म्हातारपणी लग्न

पत्र नंबर : ७

 छापण्याचे कलेचा उपयोग आता बहुत लोकांस कळू लागला आहे तेणेकरून बहुत लोकांचे डोळे उघडू लागले आहेत. जसे दोन मनुष्य जवळ जवळ बसून भाषण करतात, त्याचप्रमाणे सांप्रत सर्व देशांतील मनुष्ये, स्नेह असो अथवा नसो; परंतु त्यांचे मनोभाव बहुत अंतरावर दृष्टीस पडतात व आपले पत्रद्वारे लोकांची संभाषणे उघडपणी चालतात.
 आमचे मुखांतील ही लघुजिव्हा व आपले पत्र हे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. कारण की, त्यांचे द्वारे दूर देशीचे भाषण ऐकावयास येते व प्रतिउत्तर देता येते. असे हे परस्परे मनातील अन्वय कळविण्याचे द्वार आहे. याचा उपयोग जसा इंग्रज लोक करतात, तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवतील तर फार चांगले होईल. आणि हा समय असा आहे की, आता आपले मनातील गोष्ट उघडपणी निर्भयपणाने सांगता व कळवता येते. असे पूर्वी नव्हते. मागील राजे असे लोकांचे भाषणास मोकळीक देत नव्हते; परंतु राज्याविषयी, धर्माविषयी व आणखी किती एक प्रकरणांविषयी लोकांस बोलण्याचा प्रतिबंध होता. कितीकांच्या जिव्हा व हात तोडले जात होते. पेशवाई कारकीर्दीत कोकणात एक मामलेदार होता; त्याचे कर्म असे ऐकण्यात आहे की, एक स्त्री त्याचा जुलूम पाहून, तुझे अमलाला आग लागो, असे म्हणाली.