पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ६९

तेव्हा त्या ब्राह्मण सुभेदाराने त्या स्त्रीचे अंगास लोकर वैगैरे जळावयाजोगे पदार्थ बांधून त्याला आग लावली. अशी क्षुल्लक अपराधाकरिता स्त्री- हत्या केली. ही एकच गोष्ट नाही. अशा मी किती एक सांगेन; परंतु सांगण्याचे प्रयोजन नाही. आपल्या लोकांस त्या चाली माहीत आहेत. तेव्हा त्या दृष्टान्तावरून हल्ली छापखान्याचा किती फायदा आहे की, त्या द्वाराने वाजवी गोष्ट पाहिजे त्याने लिहून कळवावी, वाईट चालीची निंदा करावी, चांगल्या गोष्टी सुचवाव्या. सरकारविषयी व इतर कारभाराविषयी सुलभपणाने व मोकळिकेने बोलावे. अशी मोकळीक मागे कधी तरी होती काय ?
 पूर्व सर्व गोष्टी चोरीने व गुप्तपणाने होत होत्या व सरकारच्या गोष्टीविषयी कोणी बोलता कामास नये. बाजीराव पेशव्याचे अमलात दप्तरातील काही बातमी फुटली, म्हणून तीस कारकून एकदा किल्ल्यावर टाकले. असा प्रतिबंध होता. तेव्हा आता लोकांचे हिताचा समय आहे, परंतु सर्वांनी असे मनात आणिले पाहिजे की, 'तापी- तीरवासी' यांने तारीख १९ वी मार्च रविवारचे पत्रांत मजकूर कळविला, तो पाहून मला वाटते की, याने जे लिहिले आहे, ते सर्व यथास्थित आहे. लग्नासारखे स्वसत्तेतील कामात सरकारचा उपद्रव येणे, हे अगदी ठीक नाही. पूर्वीपासून लग्नाविषयी जो मजकूर आपले पत्रात छापत आहे, त्याजवरून लोकांची खात्री होईल व पुढेही खात्री करण्याकरिता उद्योग चालवून स्वइच्छेने अशा सुधारणा व्हाव्या, हे चांगले. केवळ जबरदस्तीने लोकांकडून पूर्वीपासून चालत आलेली चाल मोडवून नवी रीती काढणे, हे योग्य नाही, अशा गोष्टी लोकांनी समजुतीने मोडाव्या हेच बरे; परंतु कोणी असे म्हणतील की, हिंदु लोक इतके शहाणे नाहीत. तर काय चिंता आहे ? आजचे उद्या होईल; पण आणखी आणखी सरकारचे हातात जाणे, हे त्या उशिरापेक्षा वाईट व जे जबरीने चालू झाले, त्याचा खचितपणा नाही. जा काळी जबरी एकीकडे होईल, तेव्हा पुन्हा लोक पूर्वीप्रमाणेच करू लागतील. तेव्हा उत्तम मार्ग हाच आहे की, ही गोष्ट लोकांच्या मनात अनेक तऱ्हेने भरवून द्यावी आणि हे काम समंजस पंडित आहेत, त्यांचे आहे आणि स्वसंतोषाने लोक समजू लागले, म्हणजे पहिली चाल मोडून नवी चालू करतील. आणि किती एक देशांत असे झाले नाही काय ? पुष्कळ ठिकाणी झाले आहे.
 असे करण्याविषयी मी एक सूचना अशी करतो की, मोठे मोठे शास्त्री अगदी सुज्ञ नाहीत, असे नाही. त्यांनी बरे ही गोष्ट डोकीवर घेऊन सभा जमवून ठरवावी. लग्नकार्य झाले म्हणजे दोन पैशाचे आशेने शेकडो ब्राह्मण जमतात व उड्या घालतात. मग असे लोकहिताकरिता द्रव्याशा सोडून वर्षात एक