पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७०: शतपत्रे

दिवस का जमत नाहीत ? जर असे चार सभ्य जमतील, तर अशी गोष्ट ठरावात सहज येईल; परंतु मला वाटते की, सांप्रत काळी धैर्यवान लोक थोडे आहेत. सर्व आपले पोटाचा विचार पाहतात. हल्ली पुण्यात किती एक लग्ने होत आहेत, त्यात असे पाहण्यात येते की, पन्नास साठ वर्षांचे पुरुष मरणोन्मुख व गंतुकाम झाले तरी तरुण स्त्री करावयाची इच्छा करतात, व आर्जवी जोशी त्यांस सांगतात की, अमकी मुलगी करा, तिचे जातकात वैधव्य नाही व तुमचे आयुष्य शहाण्णव वर्षे आहे. असे हे जोशी नादी लावून मुलीचा घात करतात. असल्या कर्मास काय म्हणावे ? त्या लग्न करणाऱ्यास, मुलीचा विक्रय करणाऱ्यांस व भटास धिक्कार असो. मागाहून आणखी लिहिण्यात येईल.

♦ ♦


जुन्या समजुती

पत्र नंबर ८ : ७ मे १८६३ (?) १८४८

 आमचे लोकांच्या पुष्कळ मूर्खपणाच्या समजुती आहेत व इतकी ज्ञानाची प्रसृती झाली आहे, तरी लोकांचा वेडेपणा अद्यापि दूर झाला नाही. माझे आढळण्यात ज्या समजुती आल्या आहेत, त्यांची आपले पत्रद्वारे एक यादी प्रसिद्ध करून असे इच्छितो की, कोणी समजदार मनुष्य असेल, त्याने त्याविषयी प्रतिपादन किंवा निषेध करावा. मला वाटते की, या समजुती मूर्खपणाच्या आहेत, किंवा शहाणपणाच्या आहेत, याचा निश्चय झाला म्हणजे संशय जाईल.
 (१) ब्राह्मणाशिवाय अन्य वर्णाने विद्या करू नये. संस्कृत विद्या एकीकडेच आहे. परंतु एकादा मराठा किंवा इतर जातीचा कारकून ब्राह्मणांनी पाहिला म्हणजे त्यांचे अंगाचे तिळपापड होतात, हे काय ?
 (२) ज्ञान व विद्या वाढवू नये. कारण शहाणे व वेडे एका दराने विकतील असे भय बाळगतात.
 (३) जरी कोणी अपराध करूनही ब्राह्मणांची घरे भरली, तरी त्यांस पुण्यवान असे जाणतात, याचे उदाहरण बाजीराव पेशवे यांचे अपराध कोणी मनात आणीत नाहीत. व ब्राह्मण प्रजा त्यांस योग्य मानितात.
 (४) देव ब्राह्मणांकरिता कशीही कर्मे केली तरी चिंता नाही. यास उदाहरणे,