पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ७१

कबीराने साधूस जेवण देण्याकरिता चोरी केली, इत्यादि.
 (५) ज्या यंत्राने बहुत लोकांचे काम थोडे माणसांचे हातून करतात, ते चालू करू नये. म्हणजे डाक, छापखाना, टंकसाळ हे कारखाने लोकांचे पोटिस्त बुडविणारे म्हणून त्यांना द्वेष करतात.
 (६)सरकार करील ते करील, सत्तेपुढे शहाणपण नाही.
 (७) सर्व गोष्टी नशिबाने घडतात. शहाणपण व उद्योग यांचा उपयोग नाही.
 (८) सर्व सुख द्रव्यापासून आहे. त्यापलीकडे सुख नाही व सर्व गुणांचेही अधिष्ठान तेच आहे.
 (९) विद्या पोट भरावयाकरिता शिकावी व ती श्रीमंतांनी शिकणे जरूर नाही.
 (१०) देशाचार, वृद्धाचार, शिष्टाचार इत्यादिक जुन्या चालीविरुद्ध आचरण करू नये. मागील चाल चालत आली ती चालवावी. याविषयी आग्रह धरितात.
 (११) वाईट गोष्ट असेल आणि ती चार लोकांचे पोट भरण्याचे साधन असेल तर मोडू नये.
 (१२) घर सोडून बाहेर जात नाहीत व मुलांस वगैरे घरी बाळगण्याविषयी फार उत्कंठा धरितात.
 (१३) मुले, नातवंडे झाली म्हणजे जन्माचे सार्थक झाले, असे वडिलांस वाटते. यास्तव मुलांची लवकर लग्ने करतात.
 (१४) इंग्रजांचे राज्यात पैशास बरकत नाही. पाऊस कमी व जरीमरी फार म्हणतात. व याचे कारण देवताक्षोभ झाला आहे व इंग्रजांचे कायदे व रीती वाईट आहेत म्हणून समजतात.
 (१५) ब्राह्मणाने अपराध केला तरी त्यांस शासन करू नये व त्याचे सर्वस्वी चालविण्यात महापुण्य आहे, असे मानतात.
 (१६) धष्टपुष्ट ब्राह्मणास केला तरी तो धर्म; परंतु आंधळ्या कुळंब्यास किंवा लंगड्या महारास दिले तर तो धर्म नव्हे.
 (१७) पहिल्या लढाया व दंगे वगैरे होते, तेव्हा शिपायांचे पोट भरत होते. आता जिकडे पहावे तिकडे सामसूम झाले आहे, हे वाईट, असे कित्येकांस वाटते. कुळंबी माजले व ब्राह्मण त्यांचेबरोबर झाले, हे वाईट वाटते.
 (१८) उद्योग न करावा, हे थोरपणाचे चिन्ह व थोरांनी वेडे, भोळसर असावे; द्रव्याचा उपयोग इतकाच की, चार लोकांचे चालवावे. स्वस्थ खावे