पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२ : शतपत्रे

व निजण्यात व स्नान-संध्येत आयुष्य घालवावे हाच थोरपणा असे समजतात.
 (१९) संस्कृत विद्येखेरीज बाकीच्या विद्या व भाषा नरकाचे साधन आहेत.
 (२०) स्नान-संध्येचा डामडौल करील तो धर्मशील आणि पुण्यवान; मग त्याची वर्तणूक कशीही असो.
 (२१) स्त्रियांना विद्या शिकवू नये; कारण व्यभिचार अधिक वाढेल.
 (२२) थोडा पराक्रम व थोडीसी ब्राह्मणावर भक्ती केली की, ईश्वराचा अवतार म्हणोन त्यांची लोकांत प्रसिद्धी होते. जसे शिवाजी भवानीचा अवतार, माधवराव पेशवे विष्णूचा अवतार, इत्यादी.
 (२३) मुलगा झाला संतोष, मुलीचा संतोष नाही, अशी रूढी आहे.
 (२४) स्त्रियांचा पुनर्विवाह करू नये. कारण की, जिच्या पारब्धी सुख असेल तिचा नवरा मरणार नाही. जी अभागी तिचा मरतो.
 (२५) नवसाने देव पावतो. व मनुष्याचे सुखदुःखावर नवग्रहाचा अमल चालतो; म्हणून त्याचे नावाने ब्राह्मणास दाने वगैरे केली म्हणजे पीडा दूर होते. तसेच दुःशकुन मानणे इत्यादी.
 (२६) स्वार्थ पहावा. लोकांची काळजी करू नये. या अर्थाची म्हण आहे की, 'लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजतो?' राजाची लेकरे काय खातात, त्यांची चौकशी कशास ? या समजुतीत हिंदु लोक सांप्रत परदेशातील व स्वदेशातील वर्तमानास गैर माहीत. पलीकडचे घरी काय होते, त्याची काळजी शेजारी करीत नाही.
 (२७) आपल्या पाठीमागे कसे होईल, याची काळजी करू नये. 'आपण मेला जग बुडाला' इत्यादी म्हणी आहेत.
 (२८) पुष्कळ पैसा उधळला म्हणजे लोकांत कीर्ती होते मग तो पैसा कोठूनही येवो.
 (२९) यत्किंचित कारणाकरिता खळवाद करतात; आणि भिकारी होतात; पण त्यांस सोडीत नाहीत.
 (३०) परक्याजवळ हात जोडून राहतात; पण आपले स्वकीयाशी लढाई करतात; अशी चाल आपले लोकांची आहे. आपसांत प्राण देऊन भांडतात, पण परक्याच्या लाथा सोसून नम्र राहतात.
 एकूण तीस प्रश्न मी घातले आहेत. हे ज्यांस अमान्य असतील त्याने लिहून कळविल्यास मला फार संतोष होईल. परंतु या समयी मूर्खपणाच्या समजुती इतक्या दृढ आहेत की, त्यांस असे वाटेल की, काय हे प्रश्न ? यांची