पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ७३

उत्तरे काय द्यावयाची आहेत ? पण तसे नव्हे. या गोष्टी मोठ्या आहेत व लोकाच्या गैर समजुती जाव्या व त्यांनी सुज्ञ व्हावे अशी इच्छा ज्यांस असेल त्यासच हे पत्र आहे. इतर जे लक्ष्मीचे बंधू आहेत, त्यांचा हिशेब व गणना आमचे मनात मुळीच नाही. ते बोलले सारखे, न बोलले सारखे.

♦ ♦


हिंदु लोकांचा आळशी स्वभाव

पत्र नंबर १९ : २ जुलाई १८४८

 पूर्वी इंग्रज लोक रूमचे बादशाहाचे अमलात होते, त्या वेळेस हे फार दरिद्री व हल्ली हिंदु लोक दिसतात याहूनही मूर्ख होते. यांस राज्यनीती, कायदा, शास्त्र, नेमधर्म काही चांगले नव्हते. व ते रूमचे लोक इंग्रजांची बेटे घेऊन जेव्हा तेथे राज्य करीत होते, तेव्हा गुलाम खरेदी करण्याची चाल होती; परंतु रूम शहरात गुलाम विकावयास आणले म्हणजे लोकांनी पुसावे की, 'हा मुलगा कोणाचा आहे ?' आणि जर विकणाराने सांगितले की, हा इंग्रजाचे बेटातील, तर घेणारे म्हणत, 'अरे छीः ! फुकट दिला तरी नको.' कारण इंग्रज लोक जसे मूर्ख व कुबुद्ध आहेत, तसे कोणत्याही देशातील लोक नाहीत, असे हे लोक म्हणत होते. अशा गोष्टी ग्रंथांतरी वाचितो.
 परंतु आता इंग्रज लोकांकडे पाहिले, म्हणजे ईश्वराचा मोठा चमत्कारिक खेळ आहे, असे वाटते. दोन हजार वर्षांपूर्वी इतक्या मूर्खपणाचे स्थितीत जे लोक होते, ते हल्ली केवढे शहाणपणाचे स्थितीत आहेत ? व हिंदुस्थानातील लोक दोन हजार वर्षांपूर्वी मोठे पराक्रमी होते, त्यांची अवस्था काय झाली आहे ? तेव्हा या दोन्ही गोष्टींचा शोध करणे अवश्य आहे. असे असून आपले लोक किती भ्रांतीत आहेत ?
 दिवसेंदिवस आपले लोकांतील थोरपणा जात चालला आहे. शहाणपण पूर्वीच गेले; नंतर द्रव्यही गेले. म्हण आहे की, 'आधीं शहाणपण जाते, मग भांडवल जाते.' तसेच या लोकांचे झाले आहे. अद्यापि या लोकांस कोण कोठे आहे. पृथ्वीवर रचना कशी आहे, किती प्रकारचे लोक आहेत व राष्ट्र किती आहेत, याविषयी काही कळत नाही. लिहिणे आणि वाचणे झाले म्हणजे