पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४ : शतपत्रे

मोठी विद्या झाली, असा सांप्रत काळचा घाट आहे; परंतु लिहिणे व वाचणे हे विद्येचे द्वार मात्र आहे, विद्या नव्हे, विद्या पुढेच आहे. परंतु लोकांच्या समजुती इतक्या आखूड झाल्या आहेत की, ते अंधेरात गर्क आहेत.
 इंग्रज लोक इकडे येऊन राज्य करतात व त्यांजकडे आमचे लोक तोंडात बोट घालून चमत्काराने पाहत राहतात. आणि खावयास मिळत नाही, म्हणून चरफडतात. ऐश्वर्य गेले, असे त्यांस वाटते; परंतु याचे कारण काय ? आपले देशाची अवस्था अशी कशाने झाली ? इंग्रज कोठून आले? त्यांचे राज्य कसे आहे व आपण चांगले होण्यास काय उपाय करावा ? या गोष्टींचा विचार कोणी करीत नाहीत. केवळ जनावरांप्रमाणे मारले तर लागते; परंतु पुढे बुद्धी चालत नाही. तद्वत् हे लोक शुद्ध बैल व विचारशून्य आहेत, गर्वाने आपले ब्राह्मण लोक जळतात व इतर लोकांस तर ज्ञानच नाही. व हे असे होणे, तरी ब्राह्मणांचेच कपट आहे, तेव्हा आता इतकाच उपाय आहे की, यांणीं आपले राजे इंग्रज यांचा शोध करावा व त्यांचे देशात जावयाचे नाही, वगैरे ज्या समजुती आहेत, त्या सोडाव्या, म्हणजे त्यांचे शहाणपण यांस येईल.
 एक गोष्ट आठवली आहे, ती अशी- कोणी एक ब्राह्मण आताचे मूर्ख ब्राह्मणांसारिखा होता. त्याचे घरात एक चोर शिरून दागिने उचलून घेऊन चालला; तो ब्राह्मणाचे बायकोने त्यांस पाहून, नवऱ्यास हाक मारून सांगितले की, 'चोरास धरा.' तेव्हा तो म्हणू लागला की, "मी ब्राह्मण आहे, व चोराची जात कोण आहे, याचा मला ठिकाण नाही. तेव्हा मी त्यांस शिवू कसा ? त्याणें कांही नेले तरी चिंता नाही." असे म्हणून त्या ब्राह्मणाने आपले सर्वस्व गमावले, व चोराने ते भाषण ऐकून सावधगिरीने अधिक लाभ करून घेतला.
 आता पहा, या भटाप्रमाणे आमचे लोकांची अवस्था आहे. परदेशचे लोक येऊन इकडे राज्य करतात. आणि हिंदू लोकांचे सारथी ब्राह्मण लोक, ते म्हणतात की, आमचा धर्म अरबांचे व इंग्रजांचे देशांत जावयाचा नाही; व त्याविषयी आम्ही मनात आणणार नाही. सारांश, ते अपवित्र असे म्हणून परकी लोकांस मात्र स्वस्थपणे राज्य करावयास सापडते व आमचा सर्व व्यापार त्यांचे हस्तगत झाला आहे. जर आपले लोक विलायतेत जाऊन तेथील माहितगारी करून घेते, तर आता जसे इंग्रजास भित तसे न भिते. सामान्यतः इंग्रज लोक इकडे आले, म्हणजे स्वर्गाहून इंद्र खाली आल्याप्रमाणे लोकांस वाटून, त्यांजविषयी भय उत्पन्न होते. असा हिंदू लोकांचा गरीब स्वभाव, यामुळे ते हतवीर्य झाले आहेत. त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही व मूर्खपणा फार वाढला आहे.