पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




लोकहितवादी - अल्पचरित्र


 लोकहितवादी यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म १८- २- १८२३ या दिवशी झाला. त्यांच्या कुळाचे मूळ नाव 'सिधये' असे होते. देशमुख हे नाव वतनावरून पडले. त्यांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. गोपाळराव तेरा वर्षांचे असतानाच ते वारले आणि लगोलग ब्रिटिश सरकारने त्यांचा सरंजाम खालसा केला. तो परत मिळावा म्हणून गोपाळरावांचे बंधू चिंतामणराव यांनी पुष्कळ खटपट केली पण उपयोग झाला नाही. फक्त त्यांच्या मातुश्रींना सालीना रु. ६०० व तिघा भावांना सालीना रु. २०० तनखा देण्याचा ठराव झाला.
 इ.स. १८४१ साली गोपाळराव इंग्रजी शाळेत दाखल झाले. तेथील अभ्यासक्रम त्यांनी तीन वर्षांत पुरा केला. पण त्या आधीच त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध या ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्या काळच्या रीतीप्रमाणे पोहणे, घोड्यावर बसणे, नेम मारणे यांतही ते तरबेज झाले होते. पुढील थोड्याच काळात संस्कृत, गुजराथी, फारशी या भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. इतिहासाची तर त्यांना लहानपणापासूनच गोडी होती. ही त्यांची पूर्ववयातील तपश्चर्याच त्यांना ग्रंथरचनेच्या कामी उपयोगी आली.
 इ. स. १८४३ साली त्यांना दक्षिणेतील सरदारांच्या एजंटाच्या कचेरीत ट्रान्सलेटरची जागा मिळाली. तेथून सरकारी नोकरीत ते सारखेच उत्कर्ष पावत गेले. १८४६ साली त्यांनी मुनसफीची परीक्षा दिली. १८५२ साली वाई येथे त्यांची 'फर्स्टक्लास मुनसफ' म्हणून नेमणूक झाली. १८५६ साली 'सब असिस्टंट इनामकमिशनर' म्हणून त्यांची नेमणूक झाली. या कामावर ते असताना त्यांच्याविषयी लोकापवाद फार उठले होते, अनेकांची इनामे खालसा करण्याची, त्यांनी सरकारी धोरणान्वये शिफारस केली. यात त्यांनी बराच पक्षपात केला असा लोकापवाद होता, पण लोकापवादाला नेहमी आधार असतोच असे नाही.