या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतपत्रांतील कांहीं उतारे. होईल. पृथ्वीवर आमच्या इतके शहाणे लोक कोणीच नाहीत व आमच्या देशाशिवाय पृथ्वीवर काही देश नाही. इंग्रज लोक हे समुद्रातील बेटांतील माकठांसारखी मनुष्ये इकडे आली आहेत इत्यादी वेडगळपणाच्या समजुती बहुतेक ब्राह्मणांच्या आहेत. व जों जो ब्राह्मण लोक श्रीमंत होतात तों तो ज्ञान कमी होते. जे मोठाले सरदार व जहागीरदार आहेत त्यांस पृथ्वीवर काय होते याची खबर नाही. झोपेत, निशेत व स्त्रियांच्या संगतींत ते निमग्न असतात. परंतु येणेकरून काय उपयोग ? बाजीराव पेशव्यांचे शाळेतील शिष्य बहूत झाले आहेत. त्यांस अतिशय गरिबी आल्याशिवाय भ्रांती जाईल असे दिसत नाही. जशी नवज्वरास बहूत लंघने पाहिजेत तसे हे आहे. विद्येचा उपयोग पोटास मिळवावयाचे, इतकें मात्र लोक समजतात. पण ते असें मनांत आणीत नाहीत की, मनूने इतके ग्रंथ व व्यासांनी अठरा पुराणें लिहिली हे काय ? त्यास वेतन कोणी ठरविले होते ? विद्यावृद्धीची चाल ब्राह्मणांनी सोडली म्हणून त्यांची अशी अवस्था झाली आहे." - याचप्रमाणे १८ नंबरच्या पत्रांत 'आर्जवीपणा व डौलीपणा' हा विषय घेऊन, व नंबर चारच्या पत्रांत पुण्यातील शिमग्याच्या सणाचे वर्णन करितांना, श्रीमंत व गरीब अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे दुर्गुण गोपाळरावांनी दाखविले आहेत. देशांतील कुलीन व नैसर्गीक पुढारीपणा ज्यांच्या हातांत होता अशा पांढरपेशा लोकांचा वर्ग हा असा होता. यामुळे, या वर्गाच्या राजानष्ठेबद्दल शंका असल्यामुळे सरकार या मंडळींना जवळ करीत नसे. हुद्याच्या जागा वगैरे द्यावयाच्या झाल्या म्हणजे बुद्धिमान, कर्त्या, पण उपऱ्या अशा लोकांना त्या दिल्या जात व त्यामुळे खालच्या अधिकारी वर्गात लांच, अरेरावी, लोकांविषयीं बेपर्वाई, खुषामत करणे वगैरे अनेक दुर्गुणांचे प्राबल्य होते;