पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/108

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'अगं कसलाबी त्रास असू दे. भवानीमाय दूर करती बघ.'
 'कसला बी त्रास?'
 'व्हय व्हय कसलाबी'
 आणि मग तो लुगडं नेसलेला भारूड चालू करतो.
 'सत्वर पाव गं मला भवानी आय रोडगा वाहीन तुला' या संवादामुळे एक खुमासदारपणा तर येतोच; पण विषयाची वाटही रिकामी होते.

 भारूड हे मराठी लोकमानसाच्या मनावरचं गारूड आहे. अशा प्रकारची रूपकात्मक रचना मराठीतच लोकाभिमुख झाली. वर्षानुवर्षे तिचा पगडा माणसांच्या मनावर आहे. भारुडातून खऱ्या अर्थाने जनजागरण होते म्हणून बऱ्याचशा संतांनी याचा उपयोग करून घेतला अहे. भारुडाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचणे सोपे होते, याची त्यांना जाणीव होती. हरिकीर्तनानंतर लळीत असायचे त्यातूनच रूपक हा नाट्यप्रकार. रूपक आणि भारूड यांचा तर खूपसा जवळ संबंध आहे. अध्यात्म सांगताना रूपकाचा वापर करून सांगितले तर ते समजायलाही सोपे पडते, त्यामुळे भारूड ही सर्वांपर्यंत पोचू शकली. खेडोपाड्यात लोकांना अजूनही भारुडे गायला ऐकायला आवडतात. त्याचं हेच तर कारण आहे. खूप काळपर्यंत भारुडे लोकमानसावर अधिराज्य राहतील, यात शंका नाही.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०७॥