पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलल्यावर बाणाई थोडीच गप्प बसणार! ती काही स्वतः होऊन मल्हारीच्या मागे लागून आलेली नव्हती. मल्हारीच तिच्या सौंदर्यावर भाळला होता. राजवाडा सोडून धनगरवाड्यात आला होता. त्यानं तिला मागणी घातली होती. धनगर बनून तिच्याबरोबर त्यानं काही काळ गुजारला होता. म्हाळसाचं ऐकून बाणाईचा अपमान झाला, ती चिडून म्हणाली.

तू वाण्याची हायेस म्हूण करशिल पडिभार
आम्ही धनगरणी जशा नागिणी मोठ्या शिरजोर!
तुज्या येवानं आमच्या घरी वळिली खिल्लारं
लेंड्या, लोकर कन्या मिसळी तुझाच भर्तार!

 वाण्याच्या जातीची असलीस म्हणून जास्त कौतुक करू नकोस. आम्ही धनगरणी नागिणीसारख्या आहोत. काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही, अशा भाषेत तिनं म्हाळसाला प्रत्युत्तर दिलं आहे.
 खंडोबाच्या संबंधातली अशी लोकगीते खंडोबाच्या चरित्रावर प्रकाश टाकणारी आहेत. मुळात कानडी मानला जाणारा हा 'मल्लारी' देव; पण विठोबा जसा कानडी असून, महाराष्ट्रात रुजला तसाच हा 'मल्लारी' महाराष्ट्रात मल्हारी बनून नावारूपास आला.
 कोळ्याच्या जातीतही खंडोबाची भक्ती करणारे आढळतात. त्यांच्या एका लोकगीतांमध्येही मल्हारी जेव्हा प्रथम बानूला भेटला. त्याचं कोळीगीत आढळतं. इथं बानूची भानय' आणि खंडोबाचा 'खंडेराव' झालेला आहे.

चालली चालली गो भानयबाय बाऊडी पान्याला
उसलील्या निली भानयनी बुरायिल्या दुरी
मगारी बगिते गो भानयला वलवायला नाई कोनी
तवारसी येत होता गो खंडेराव देवू
तो ते बाद घोडेवर बैसला गो

 अशा कोळीगीतातून भानय व खंडेरावची वर्णनं येतात. कोळी लोकांच्यात 'मल्हारकोळी' नावाची एक उपजातीही आहे.
 अनेक लोकगीतं आणि लोककथा खंडोबाबद्दल प्रसिद्ध आहेत. खंडोबाचे प्रकटीकरण, त्याचं बानूच्या नादाला लागणं. त्यांचा म्हाळसेशी विवाह. याबद्दल अनेक गीतं ऐकायला मिळतात आणि खंडोबाच्या या कुटुंबाचं कुतूहल वाढत जातं.

 हा खंडोबा मूळचा कुठला? त्याची स्थाने कुठं-कुठं आहेत? त्याच्या यात्रा मोठ्या प्रमाणावर अजूनही भरल्या जातात. लोकमानसातला खूप मोठा भाग त्याची भक्ती करणारा आहे. वाघ्यामुरळीसारखे त्याचे उपासक निर्माण झाले आहेत. गेली कित्येक वर्षे हे त्याची उपासना तर करत

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११० ॥