पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

जात्यावरची ओवी



जात्या ईसवरा  तुला वड्नी पाहिलं
मावलीचं दूध  तुझ्या कारनी लावीलं
जात्या ईसवरा  तिळा तांदळाचा घास
माझ्या प्रेमायाचा  नवरा मोतियाचा घोस
जात्या ईसवरा  जड जाशी दाटयीनी
तुझ्या शिनयीची  आनूं सौंगड कुठूयीनी

 खरंच आता अशी जात्यावरची ओवी कानी पडण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. जवळ-जवळ संपत आलंय म्हटलं तरी चालेल; पण खेड्यापाड्यात अजून कुठंतरी ओवीची जाग शाबीत आहे. पहाटेचा प्रहर... उजेड पडायला नुकतीच कुठं सुरवात झालीय अशा वेळी जात्याला ईश्वर मानून, एक पाय लांब करून व दुसरा पाय गुडघ्यात दुमडून जात्यावर कोणीतरी स्त्री दळण दळत असते. जात जड येत असतं. ते फिरवताना जीव दमगीर होत असतो. पहाटेच्या वेळी सुद्धा कपाळावर घामाचे थेंब गोळा झालेले असतात. मधूनच पदराच्या शेवाने ती कपाळावरचे घामाचे थेंब टिपत असते. हे श्रम कमी वाटावेत. जाणवू नयेत म्हणून मग तिच्या मनातल्या भावना आपसुक तिच्या ओठातून बाहेर पडू लागतात. आठवणींचा ओघ तिच्या मनात रुंजी घालू लागतो. सुखदुःख, अपेक्षा ओवीच्या रूपाने ओठातून बाहेर पडू लागतात. जात्याच्या घरघरीत, ओवी एक वेगळा भोवताल निर्माण करते. त्या नादात तिला ओढायला लागणाऱ्या जात्याचे श्रम जाणवत नाहीत. ईश्वर मानलेल्या जात्याला ती सुख दुःख सांगून मोकळी होते. कुठंतरी त्या दिवसापुरतं तरी तिचं मन हलकं हलकं होतं.

 खरं तर ओवी म्हटलं तर एक प्रकारची कविताच. जात्यावरची ओवी ही वर्षानुवर्षे गायली जात आहे. एकीनं गायली दुसरीनं ऐकली असा प्रवास चालत ती जिवंत आहे. या ओव्यावर कोणा एकाचा मालकी हक्क नाही. या कोणी रचल्या हे सांगता येत नाही. अशिक्षित स्त्रीच्या मनातील जाणिवांचं.' भावभावनांचं हे एक सशक्त प्रकटीकरण आहे. हे पूर्वांपार जपलं गेलेलं स्त्री धन आहे.

 ओवीचे चरण तीन - आदि चरण, मध्य चरण आणि अंती प्रसाद. असे ग्रंथातील लक्षण आहे; पण नंतरच्या काळात साडेतीन व साडेचार चरणाची ओवी ही आढळून येते.

 जात्यावरची ओवी ज्या माय-भगिनींनी रचली, गायली त्या खरं तर अशिक्षित; पण त्यांची प्रतिभा पाहिली की मात्र अचंबित व्हायला होतं. त्या काळातली समाजरचना, रीत-भात, परंपरा, पुरुषी वर्चस्व, वेगवेगळे नातेबंध, निसर्गाची वेगवेगळी रूपं सगळं सगळं या जात्यावरच्या ओव्यातलोकसंस्कृतीचा गाभारा ॥ २१ ॥