पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घाम टिपताना कुंकू अखंड टिकावं म्हणून त्यास जडीव कोंदणाची उपमा दिली आहे आणि सान्याच्या लक्ष्मीच्या हातान दळलेलं हे दळण चंदनासारखं बारीक निघालं आहे. असं ती म्हणते. हे सगळं वर्णनच एखाद्या तालेवार कवीच्या लेखनीला शोभेल इतकं शोभिवंत आहे. जात्यावर बसल, का आवा सुचत अस म्हटल जातं; पण जर काही वेळा जात्यावर बसल्यावर कोणी ओवी म्हणेना, तर ओवीतूनच समजही दिली जाते.

मुक्यान दळान  गिरजा नारीला हईना
माता चांगुनाच्या घरी  ऋषी भोजन करिना
मुक्यानं दळान  तूला कसं ग व्हतं नारी
भाऊभाचीयाच दल्लं  तुझ्या उतरलं दारी
जात्यावर बसावं  तवर जात्याशी बोलावं
सव्वाशेराचं लुगडं  आपल्या ध्याईव तोलावं

 बाईने दळावयाचे तर आनंदानं प्रसन्नपणे ओवी म्हणत दळायला पाहिजे, असं सांगताना चांगुणेचे सत्त्व ऋषीने पाहिले याची आठवण इथे दिली आहे.
 जोपर्यंत आपण जात्यावर बसतो, तोपर्यंत त्याच्याशी बोलले पाहिजे म्हणजे मग सव्वाशेर वजनाचे रेशमी लुगडे अंगावर यायला हरकत पडत नाही.
 शेवटी जातं हे बाईच्या जातीला अत्यंत जवळच आहे. मनातली सुख दुःख त्याच्याशी बोलता येतात. मनीचं गुज त्याला सांगता येतं. म्हणून त्या जात्याविषयी त्या बाईला अपरंपार आपुलकी आहे.

सरलं गं दळान  माजं पायली पायली
विसाव्याची जागा  बाई माजी ती माऊली

 जशी आई ही विसाव्याची जागा आहे. तिच्या कुशीत बाईला मन मोकळं करता येतं तसंच जातं हे सुद्धा तिच्या मनाच्या विसाव्याची जागा आहे.

 या जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, की जाणवतं अशिक्षित स्त्रीचा हा मन-उमाळ्याचा हुंकार आहे. कधी हंदका सुद्धा आहे. या ओव्यात दिल्या गेलेल्या उपमा या त्याच्या नित्यनियमाच्या आयुष्यातील आहेत. इथे आईला ती गारव्याचं झाड व जात्याला विसाव्याची जागा म्हणते. दळलेल्या बारीक पिठाला चंदनाची उपमा देते. चिताकाचा फासाची उपमा नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला देते. हा एक प्रकारचा सुंदर प्रतिभाविष्कार आहे. उन्हाळ्याच्या उन्हात झाडाचं पान करपून जातं तसं सासुरवाशीणीचं मन बऱ्याच वेळा उदास झालेलं असतं. असं ती ओवीत म्हणते. त्यावेळी ती वेदना ऐकणाऱ्याच्या मनात त्या दु:खाची तीव्र जाणून करून देते. जात्यावरच्या ओवीत हृदयाला भिडण्याची ती शक्ती आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३३ ॥