पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळकांचे केसरींतील लेख

आणि कऱ्हाडे याचेंच या बाबदींत कां पटूं नये? हें मिथ्या बंड मोडून जाऊन या तिन्ही वर्गांचा परस्पराशीं लग्नसंस्कार होण्यास खुला रस्ता पडावा असें पुष्कळांच्या मनांत आहे. पण पाहावें तों धीर धरून लोकांपुढे असें स्पष्ट म्हणून दाखविण्यास कोणीच हिय्या करीत नाही, ही मोठी दुःखाची गोष्ट होय!

 'ज्याला मुलगी झाली, तो पापी' असा कित्येक लोकांत समज आहे, तो अगदींच भ्रांतिमूलक आहे असें आमच्याने म्हणवत नाहीं, कारण, बालविवाहाची चाल अजून सर्वत्र अमलात असल्यामुळें वधूवरांची गांठ बांधणें सर्वथैव उभयतांच्या मातापितरावर अवलंबून असतें. असें असल्यामुलें ज्या मनुष्यास ईश्वरक्रुपेने आपल्या पदरी पडलेल्या मनुष्याचे कल्याण करणे आपलें कर्तव्यकर्म आहे असें वाटते, अशाला मुलगी होणे म्हणजे पाप नव्हे तर काय? पाप पाप तें करतें काय? पापी मनुष्याला ते सुख होऊं देत नाही. अमुक एका व्यक्तीचे बरेंवाईट झाल्याबद्दल माझ्यावर जबाबदारी आहे, असें मानणाऱ्यास मुलगी चांगल्या ठिकाणीं पडून नांदूं लागेपर्यंत केवढी टोंचणी असते, हे येथें विशेष व्यक्त करण्य़ाची गरज नाही. कऱ्हाड्यांची जात थोडी; यामुळें परस्परांना योग्य अशीं स्थळें मिळण्याची त्यांच्यांत फार मारमार पडते. देशपरत्वे कालमानानें कोंकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे यांना कित्येक गुण एकमेकांकडे पाहून टाकण्यासारखे आले आहेत. ही गोष्ट तडीस जाण्यास या तीन वर्गांचा परस्पर लग्नसंबंध सुरू झाला पाहीजे. परोपकार, दातृत्व, अौदार्य या गुणांत कोंकणस्थांना देशस्थांचे अनुकरण करणें थोडेंसें अवश्य आहे असें म्हटल्यास फारसा बाध येईल असें वाटत नाही. देशस्थांनाही कोंकणस्थांपासून स्वच्छपणा, उद्य़ोगीपणा, धाडसपणा, मितव्यय वगैरे गुण घेण्यास वाईट वाटूं नये. कऱ्हाडे साधारणपणे दोघांच्यामधे पडतील असे वाटतें. तथापि दोघानाही कऱ्हाड्यांची टापटीप शिकणे जरूर आहे. तीन वर्गांचा लग्नसंबंध होत नसल्यामुळें कित्येक वेळीं केवळ अडचणीमुळे विवाहसंबंधानें बद्ध अशीं स्त्रीपुरुषांची अगदीं विसंगत जोडपी दृष्टीस पडतात. थोरामोठ्यांच्या रूपसंपन्न कुलीन कन्या निर्द्रव्य, कुरूप, अक्षरशत्रु अशा पुरूषांच्या पदरीं पडाव्या हें किती खेदकारक आहे बरें? पण अशी उदाहरणें थोडीं आहेत काय? विद्यासंपन्न, रूपसंपन्न, द्रव्यसंपन्न, अशा कुलीन गृहस्थास आईबापांनी करून दिलेल्या वेड्यावाकड्या बायकांशीं आपलीं आयुष्यें कंठावी लागत नाहींत काय? त्याप्रमाणेंच रूपवती आणि कुलीन मुली, मूर्ख, रोगग्रस्त आणि निर्धन पुरूषांच्या पदरी पडल्यामुळें कपाळास बोट लावून प्रारब्धास दोष लाविताना आपण पाहात नाहीं काय?

 अशी स्थिति आपल्या डोळ्यापुढें असून विचार न करितां स्वस्थ बसणें हें आपणांस मोठें दूषणास्पद होय. वधूस अनुरूप वर मिळण्यास ज्यांतून वर पसंत करावयाचा त्यांची संख्या मोठी पाहिजे. अनुरूपत्व फक्त वयाच्या किंवा पैशाच्याच संबंधाने पाहावयाचें नाहीं. गुण, रूप, कुल, विद्या, स्वभाव इत्यादि संबं-