पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता १७

चिरकाल ठेवावें, ही इच्छा मनुष्यांत सहज उद्भवली. "आत्मानं सततं रक्षेद्दाररैपि धनैरपि" या नीतिवाक्याचें जें मूळ आहे, त्यानेंच मेल्यावरही आपलेपणाचें रक्षण करण्याकरितां, पुत्राची आवश्यकता सिद्ध होते. तशांत ज्या वेळीं मनुष्यजातीची स्थिति अगदी बाल्यावस्थेंत होती, त्या वेळी तर पुत्रोप्तादनाची इच्छा विशेष बळकट होण्याचा जास्त संभव होता. मनुष्यजातीची पहिली सुधारलेली अवस्था म्हणजे कुटुंबावस्था होय. कंदमूलादिकावर निर्वाह करून वनचर श्वापदाप्रमाणें हवें तिकडे भटकावें ही आपली अगदी पहिली स्थिति होय. अद्यापिही आफ्रिकेच्या व अमेरिकेच्या रानांतून असली काहीं मनुष्ये आढळतात. यानंतरची स्थिति म्हटली म्हणजे, उदरनिर्वाहाकरिता कंदमूलादिकावर अवलंबून न राह्ता, गाई, म्हशी वगैरे दुभती जनावरें बाळगून त्यास चारा मिळेल तिकडे सहकुटुंब त्यांच्या पाठोपाठ हिंडत जाणे ही होय. या काली शेतकीची युक्ति निघून गाव वसलें नव्ह्तें. कुटुंबतील मुख्य पुरूष इतर माणसावर त्या कालीं अगदी राजाप्रमाणें अंमल चालवीत असे, व कुटुंबाचें सर्व ओझें त्या एकट्याच्या माथीं पडत असे. आता आपण असा विचार करूं, कीं अशा काळी एकाद्या कुटुंबातील स्थिति काय होईल? बिचा-यास कोणीही त्राता न राहून रानावनात हिंडावें लागेल ! आपल्या पाठीमागे आपलें नाव चालविण्याची इच्छा राहूं द्या ! पण आपल्या कुटुंबाचें पोषण करण्यास तरी आपल्या पाठीमागें कोणी पाहिजे, अशी स्वाभाविक इच्छा नाही का होणार? मग त्यात नाव चालविण्याच्या इच्छेची भार पडल्यावर काय विचारायाचे ? आपल्या वैदिकऋषींची सामाजिक स्थिति बहुधा वर लिहिल्याप्रमाणेंच होती. हें मनांत आलें म्हणजे "कुचबी करना और लडका बनाना," अशी जी त्याची उत्कट इच्छा असे तिचें बीज आपणास कळून येईल ! जसजशीं मनुष्यजातीची स्थिति सुधारत चालली, अनेक कुटुबे एका ठिकाणीं राहू लागून गाव वसले, व एका कुटुंबांतील माणसानी दुस-या कुटुबातील माणसांस त्रास दिल्यास, त्याचा निर्णय पंचाच्यामार्फत होऊं लागला, तसतसा कुटुंबात मुख्य नसला तरी, त्याची व्यवस्था साधारपणें बरी राहील असा भरंवसा प्रत्येकास वाटूं लागला. तथापि आपले नाव चिरकाल राहाण्याचे पुत्रोत्पादनाखेरीज दुसरे उपाय नव्ह्ते. सर्वांनी मिळून जमिनीची लागवड करून त्यावर एकोप्यानें राहून निर्वाह करावा यापेक्षां या स्थितीत मनुष्याचा दुसरा कांही हेतु नव्ह्ता. धाडस, पराक्रम, विद्या, कवित्व, औदार्य वगैरे ज्या गुणांनीं, पराशराम, राम, कृष्ण, कर्ण, व्यास, कालिदास वगैरे प्राचीन मंडळी, व तुकाराम, मोरोपंत, बाजीराव, नाना फडणवीस, सर जमशेटजी जिजीभाई वगैरे अर्वाचीन मंडळी अजरामर झाली, ते गुण त्या काळीं मनुष्यात आले नव्हते म्हणा, किंवा आले असूनही त्याचा विकास होण्यास त्या वेळची सामाजिक स्थिति अनुकूल नव्हती म्हणा; कसेंही असो. मनुष्यजातीच्या पूर्वावस्थेंत नांव चालविण्यास ज्याप्रमाणें पुत्राची जरूर असे,