पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० लो. टिळकांचे केसरींतील लेख

पूर्णपणे मोड झाला हें वाचकांस अवगत आहेच; परंतु ती करण्यांत मतलब काय होता हें कदाचित सामान्य वाचकांस कळलें नसेल. आपला हीन पक्ष आहे हें जाणून, व तो पक्ष सबळ होण्याची आशा नाहीं असें समजून, मंडळींनी विचार केला कीं हिंदुधर्मातील रीतीभातींनी आमचा पुष्कळ तोटा होत आहे, हें अर्जात हलकेंच घुसडून द्यावे, व आपल्या पुढील खटपटीस तितकीच बळकटी करून घ्यावी, अशा युक्तीनें लोकाच्या डोळ्यात धूळ पाडता येईल. ही शक्कल ज्यास सुचली, त्यांस प्रथम आपल्या अकलेची केवढी वाहवा वाटली असेल, व मागून मुंबईतील लोकाची धूर्तता पाहून, त्याचा किती निरुत्साह झाला असेल? क्षूद्रप्राणीही मरतां मरतां हात पाय झाडल्यावाचून रहात नाहीं. आपलें सर्व वाग्जाल फुकट जाणार, आपला भ्रमाचा भोपळा फुटून आपली सर्वत्र उपहास्यता होणार, व अविचार, दुराग्रह व मंदमति - या त्रिदोषाने आपली किर्ति पंचत्व पावणार, हें पाहून, या तीव्र सुधारकानीं सभेच्या कामावर व तेथें जमलेल्या मंडळीवर, व त्याच्या साहजिक व अनिवार्य कृत्यांवर मिथ्याक्षेप करण्यास आरंभ केला. कोणी व्याघ्रचर्मानें आपलें शरीर व कर्णयुगुल झाकीत झाकीत, सभेमध्यें केवढा घोटाला, केवढी लाथाळी, व कलकलाट होता, अशा त-हेची तक्रार अध्यक्षाकडे करूं लागला; पण त्या सर्वांत आपला व आपल्या सजातीयाचा कितीतरी भाग होता, हें साहजिकच विसरून गेला. कोणी आमचा पक्ष फारच मोठा होता, परंतु त्यास आपले अस्तित्व दाखविण्यास संधि सांपडली नाहीं व त्यामुळे तो कोंणाचे दृष्टीस पडला नाहीं, अशी तक्रार करूं लागला. कोणी काय त्या सभेत भाटे, वाणी वगैरे जाती होत्या, ब्राह्मण व मराठे कोठें होते, ते तर आमच्या पक्षास आहेत, अशी फुशारकी मिरवूं लागला; व कोणी ही सभा मूर्ख व अज्ञान लोकाची होती, आमच्यासारखे त्यात शहाणे किती सांपडतील, असा स्वाभिमानपूर्वक प्रश्न करून आपलें समाधान करून घेऊन तटस्थ झाला. अशा त-हेचे आक्षेप काढणारे केवळ शेंदाडशिपाई नव्हेत काय ? आपल्या पक्षाचे सबळतेची ज्यास खात्री आहे, आपल्या पक्षाकडे शहाणपणाचा मक्ता आहे, असें ज्याची मनोदेवता सागते, व हजारों सुविचारी लोक आपणास हांक मारतांच आपणांस पाठबळ देण्यास येऊन सभेची व्यवस्था व शांतपणा यांचा बिलकुल मोड करणार नाहींत, असा ज्याच्या अंतर्यामी भरवंसा असेल, तो असल्या कुरापती काढून रडत बसेल काय? प्रतिकक्षाने दुसरेच दिवशी तशीच सभा कां नाही भरविली? त्याच्या निश्चयाचीं बंधनें वरच्यासारख्या सभेनें का शिथिल व्हावीं ? सुधारणेची सूत्रे स्वत:च्या उत्साहानें एकवार हातीं घेतलीं असतां कोणत्याही धैर्यवान व बुद्धिमान पुरुषाचे हातांतून तीं याप्रमाणे गळून पडतील असें आम्हास वाटत नाहीं.

असो; परंतु या साहसी सुधारकांचा जो शेवटचा आशातंतु होता तोही आतां तुटला. सरकानेंच परपक्षाची बळकटी जाणून आपण या कामांत सुधारकांस मदत करणार नाहीं असें आतां स्पष्ट सांगितलें. सुधारकांनी आपल्या