पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ लो. टिळकांचे केसरींतील लेख

रा.ब. स असा प्रश्न आहे कीं त्यांनी 'न स्त्री' इत्यादि वाक्याच्या अर्थाची अशी लटपट कां आरंभिली आहे बरे ? कोणता तरी एक अर्थ त्यांस कायम करितां येत नाहीं काय? परंतु असें नव्हे; एकदा सरळमार्ग सुटल्यावर आडरानांत एकच मार्ग कसा निश्चित होणार? कसेंही असो; हा जो दुसरा अर्थ रा.ब.नीं काढिला आहे तो पहिल्याइतकाच किबहुना त्याहून जास्त भ्रातिमूलक आहे. प्रथमत: पित्याचे कन्येवर स्वत्वच जर नाहीं तर कन्यादानानें नाहिंसें तें काय् होणार ? वृक्षशाखेवर बसून मूलछेद करणा-या मुर्खाचा प्रकार याहून भिन्न तो कसा असतो ? बरें क्षणभर पित्याकडे हा अधिकार येतो असेंही मानले तरी फार झाले तर "पिता रक्षति कौमारे" याचा अर्थ लागेल पण "पुत्रास्तु वार्धके" याची वाट काय ? आम्ही आपल्या वाचकास असें निक्षून कळवितों कीं, "अल्पवयात लग्न झाल्याकारणानें इ." जो कार्यकरण संबंध रा.ब. नीं वर ध्वनित केला आहे ती केवळ त्याच्या खिशांतील गप्प आहे ! यास कोणत्याही स्मृतीचा किंवा टीकाकाराचा आधार नाहीं. असल्यास तो रा.ब. नी अवश्य दाखवावा अशी आमची त्यांस सूचना आहे. "लहानपणीं लग्न झाल्याकारणानें पति आपल्यास संमत नाही म्हणून पतीकडे न जाता पित्याकडेच राहिल्यास त्यात राजाने दंड करण्याजोगा अपराध होत नाहीं" यासंबंधानें "न स्त्री इ." वचन स्मृतिग्रंथात आहे काय ? काढा पाहूं कोणत्या स्मृतींत हा संबंध दिला आहे तो. नाहीं तर मिथ्याहेतुवादाचा दोष तुमच्या शिरावर येऊं पाहात आहे.

एतावता असें सिद्ध झाले कीं, "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" या वचानाचा मागील पुढील संबध, खुद्द मनुस्मृतींतील व याज्ञवल्क्यादि इतर स्मृतीतील समानार्थ वाक्यें, आणि कुल्लुक, मेधातिथि, विज्ञानेश्वरादि टीकाकारांच्या व्याख्या, ह्या पाहिल्या असता ह्या वचनाचा अर्थ, स्त्रियांस कोणताही व्यवहार पुरुषांच्या अनुमताखेरीज केंव्हाच करिता येत नाहीं, असाच करावा लागतो. आमच्याच शास्त्रचेंचसें काय पण बहुतेक सुधारलेल्या प्राचीन राष्ट्राच्या धर्मशास्त्रांचे हेंच प्रमेय आहे, हें आमच्या इतिहासज्ञ रा.ब.स आम्ही सांगावयास पाहिजे असे नाही. वेदवाक्यांतून आगगाडी किंवा तारायंत्र काढण्याचा प्रयत्न जितका असमंजस आहे तितकाच स्मृतिग्रंथातून स्त्रीस्वातंत्र्यावर वचनें काढण्याचा होय ! प्राचीनकाळीं स्त्री, पुत्र व दास, यांवर घरधन्याचे पूर्ण स्वामित्व होतें व तें होतां होता कांही राष्ट्रांत मात्र बहुतेक कमी झालें आहे.

भार्या पुत्रश्च दासश्च त्रय एवाधना स्मृता :
यत्ते समधिगच्छन्ति यस्यैते तस्य तद्धनं |

तसेंच-

या भर्ता सा स्मृतांगना